डोंबिवली- शिळफाटा रस्त्यावरील पलावा वसाहती मधील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये केंद्रीय सुरक्षा दलातून निवृत्त झालेल्या एका जवानाच्या ४८ वर्षीय पत्नीचा विनयभंग खोणी गावातील एका रहिवाशाने केला आहे. महेश रोहिदास ठोंबरे असे या इसमाचे नाव आहे. शनिवारी हा प्रकार घडला.खोणी परिसरातील विस्तारित पलावा भागात पीडित महिला आपल्या मुलीसह राहते. विकासकाकडून सोसायटी सदस्यांना हस्तांतरण करण्यासाठी विकासकाकडून एका बैठकीचे शनिवारी आयोजन केले होते. पीडित महिला आणि अन्य एक महिला या बैठकीला उपस्थित होत्या. ठोंबरे याने एका महिलेला ‘तु येथे राहत नाही. मग येथे कशाला आली आहेस,’ असे बोलून तिचा ४० सदस्यांच्या उपस्थितीत अपमान केला.
पीडित महिलेने त्या महिलेला साथ देऊन बैठकीतून जाऊ नकोस असे सांगितले. ठोंबरे यांना काय बोलायचे ते बोलू दे, त्या बोलण्याचा राग ठोंबरे याला आला. त्याने केंद्रीय सुरक्षा दलाची पत्नी असलेल्या पीडितेला सर्वांसमक्ष अश्लिल हावभाव, घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. इतर सदस्यांनी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवले. बैठक संपल्यानंतर महेश ठोंबरे पीडितेकडे रागाने पाहत बघून घेण्याचे इशारे करत निघून गेला. या सगळ्या प्रकाराने पीडित महिला अस्वस्थ होती. घडल्या प्रकाराबाबत तिने मानपाडा पोलीस ठाण्यात महेश ठोंबरे विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.