अंबरनाथ : अंबरनाथ पश्चिमेतील कल्याण बदलापूर मार्गावरून लादीनाका येथून जाणाऱ्या एका भरधाव टेम्पोने सायकलस्वरासह रस्त्यावर उभ्या दोन रुग्णवाहिकांना १५ मार्च रोजी जोरदार धडक दिली होती. या अपघातात रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या जखमी सायकलस्वार निवृत्त नौदल अधिकाऱ्याचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या पोलिसांनी संबंधित टेम्पो चालकाला अटक करत टेम्पोही जप्त केला आहे.
कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील अंबरनाथ पश्चिमेतील लादी नाका परिसरात अंबर केअर रूग्णालय आहे. या रूग्णालयासमोर भागातून १५ मार्च रोजी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास नौदलातून नुकतेच निवृत्त झालेले शिवाप्रसाद गौड हे सायकल चालवत होते. यावेळी राज्य महामार्गावरून अंबर केअर रूग्णालयाच्या समोर सायकलस्वार गौड यांच्या मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर रूग्णालयाच्या समोर उभ्या असलेल्या दोन रुग्णवाहिकांनाही हा टेम्पो धडकला. या अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या शिवाप्रसाद गौड यांना जवळील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र गुरुवारी उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी फरार टेम्पोचालकाचा शोध घेत भिवंडीतून त्याला अटक करत त्याचा टेम्पो जप्त केला आहे.