कल्याण- आर्थिक व्यवहारातून कल्याण मधील एका निवृत्त तिकीट तपासणीसाची शहापूर तालुक्या तील धसई शिवनेर गावाच्या हद्दीत निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शहापूर पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
गोपाळ रंग्या नायडू (६२, रा. चक्कीनाक, कल्याण पूर्व) असे हत्या झालेल्या निवृत्त तिकीट तपासणीसाचे नाव आहे. अरुण जगन्नाथ फर्डे (३२, रा. धसई, शहापूर), सोमनाथ रामदास जाधव (३५, रा. खडकपाडा, कल्याण), रमेश मोरे (रा. टिटवाळा) अशी आरोपींची नावे आहेत. अरुण, सोमनाथ यांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा >>> “पाऊस सुरू झाला तरी नालेसफाई नसल्याने कडोंमपाचे आठ कोटी पाण्यात”, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांची टीका
शहापूर तालुक्यातील किन्हवली मार्गावरील धसई शिवनेर गावात एका ज्येष्ठ नागरिक व्यक्तिची निर्घृण हत्या करून त्यांचा मृतदेह याच गावातील अरुण फर्डे यांच्या शेतात पुरण्यात आला आहे, अशी माहिती शहापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक सुरेश मनोरे यांना मिळाली. पोलिसांनी एकत्रितपणे या प्रकरणाचा तपास सुरू केला. धसई गावातील फर्डे यांच्या शेतातील पुरेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना संपर्क केला. कल्याण मधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात एक ६३ वर्षाची व्यक्ति बेपत्ता असल्याची नोंद आढळली. पोलिसांनी संबंधित तक्रारदारांना संपर्क करुन मृतदेह दाखविला. तो मृतदेह निवृत्ती रेल्वे तिकीट तपासणीस गोपाळ नायडू यांचा असल्याचे उघड झाले.
कल्याणच्या नागरिकाची शहापूरमध्ये हत्या करुन मृतदेह धसई गावातील शेतात का पुरण्यात आला. या दिशेेने तपास करुन पोलिसांनी शेत मालक अरुण फर्डे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी सुरू केली. या चौकशीतून रमेश मोरे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. मोरे, अरुण, सोमनाथ यांनी ही हत्या केली असल्याचे पोलीस तपासात उघड झाले.
हेही वाचा >>> ठाकुर्ली रेल्वे स्थानकात चोरी करणारी महिला टिटवाळ्यातून अटक
पोलिसांनी सांगितले, टिटवाळा येथील रमेश मोरे याने मयत गोपाळ नायडू यांच्याकडून दोन वर्षापूर्वी १६ लाख रुपये उसने घेतले होते. ते परत करण्याचा तगादा गोपाळ यांनी लावला होता. रमेश गोपाळ यांना पैसे परत न देण्याच्या मनस्थितीत होता. गोपाळ दररोज पैसे मागत असल्याने रमेशने गोपाळ यांचा काटा काढण्याचे ठरविले. पैसे परत देण्याचा निरोप देऊन रमेशने गेल्या आठवड्यात गोपाळ यांना शहापूर येथे बोलविले.
पैसे परत न करता त्यांचा शहापूर जवळील धसई गाव हद्दीत निर्घृण खून करुन त्यांचा मृतदेह अरुण फर्डे यांच्या शेतात कोणाला संशय येऊ नये म्हणून पुरण्यात आला. या हत्येची माहिती मिळताच मोठ्या कौशल्याने पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर अधीक्षक दीपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, हवालदार प्रकाश साहील, संतोष सुर्वे, प्रवीण हाबळे, सतीश कोळी, हेमंत विभुते, दीपक गायकवाड, स्वपिन बोडके यांनी हा गुन्हा उघडकीला आणला. शहापूर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.