ठाणे : महाविकास आघाडीच्या जागा वाटपात भिवंडी पूर्वची जागा समाजवादी पक्षाच्या वाट्याला गेली असतानाही त्याठिकाणी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणारे शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी अखेरच्या दिवशी बंड मागे घेतले. असे असतानाही पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका त्यांना भोवल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भिवंडी पूर्व मतदारसंघातून शिवसेना (ठाकरे गट) माजी आमदार रुपेश म्हात्रे हे निवडून आले होते. त्यांनी भाजपचे उमेदवार संतोष शेट्टी यांचा पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीत मात्र सपाचे आमदार रईस शेख यांनी रुपेश म्हात्रे यांचा पराभव केला. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत उभी फुट पडली. त्यावेळी रुपेश म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ दिली. यामुळे यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून म्हात्रे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. या मतदारसंघातून म्हात्रे यांनी पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनीही पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले होते.

हेही वाचा – डोंबिवलीचे पाणी छुप्या पद्धतीने ठाण्याला पळविण्याचे षडयंत्र, मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचा मुख्यमंत्री पिता-पुत्रावर घणाघात

हेही वाचा – Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा देण्याची मागणी समाजवादी पक्षाने केली होती. याठिकाणी पक्षाचा आमदार असल्याने ही जागा देण्याचा आग्रह सपाने धरला. तर ठाकरे गटही या जागेसाठी आग्रही होता. अखेर आघाडीच्या जागा वाटपात ही जागा सपाच्या वाट्याला गेली आणि त्यांनी रईस शेख यांना उमेदवारी दिली. यामुळे म्हात्रे यांनी पक्षातर्फे भरलेला अर्ज बाद झाला तर त्यांचा अपक्ष अर्ज कायम होता. अखेर पक्ष नेत्यांच्या विनंतीनंतर म्हात्रे यांनी अपक्ष अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली होती. असे असतानाच दुसऱ्याच दिवशी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे. यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे. हा अर्ज मागे घेण्याआधी काही दिवसांपूर्वी म्हात्रे यांनी शहरात एक सभा घेतली होती. त्यात त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टिका केली होती. वांद्रे आणि वरळी मतदारसंघात मदत व्हावी यासाठी भिवंडीत समाजवादीचा उमेदवार देण्यात आला. त्यांच्या राजकारणासाठी आमचा प्रत्येकवेळी बळी देण्यात आला आहे. पक्षाने भिवंडीच्या बाबतीत नेहमी सावत्र वागणूक दिली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी आणि आता उद्धव ठाकरे देखील हेच करत आहेत. कोणत्याही पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये, असे विधान त्यांनी सभेत केले होते. हेच विधान त्यांना भोवल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Retreat of rupesh mhatre still expelled from the party criticism of party chief uddhav thackeray ssb