कल्याण – लोकसभा निवडणुकीच्या काळात कल्याण पश्चिमेत शिवसेनेने काम न केल्याचा राग, कल्याण पश्चिमेत भाजपचे वरूण पाटील यांनी बंडखोरी करून दाखल केलेला उमेदवारी अर्ज. यावरून कल्याण पश्चिमेत शिंदे शिवसेना आणि भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्यात रुसवेफुगवे सुरू होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा रुसवा सोडून मंत्री कपील पाटील, बंडखोर भाजप उमेदवार वरूण पाटील यांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात सहभागी व्हावे यासाठी शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी जोरदार प्रयत्नशील होते. अखेर रविवारी ही मसलत पूर्ण होऊन मंत्री कपील पाटील यांनी विश्वनाथ भोईर यांना निवडणुकीत पूर्ण साथ देण्याची तयारी दर्शविली असल्याचे विश्वसनीय सुत्राने सांगितले.
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा एक भाग. या मतदारसंघात भाजपचे कपील पाटील यांनी एक लाखाहून अधिक मते घेतली होती. राष्ट्रवादीचे खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी ७० हजाराहून अधिक मते घेतली होती. कपील पाटील यांना मानणारा मोठा वर्ग कल्याण पश्चिमेत असल्याने त्यांची साथ कल्याण पश्चिमेतील महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे विश्वनाथ भोईर यांच्यासाठी महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कल्याण पश्चिमेत काम न केल्याचा कपील पाटील समर्थकांचा आरोप होता. त्यामुळे कपील पाटील आणि शिवसेनेत मागील काही महिन्यांपासून रुसवाफुगवा निर्माण झाला होता. या रुसव्यातून कपील पाटील यांचे भाजपमधील नातेवाईक कल्याण मंडल अध्यक्ष वरूण पाटील यांनी पश्चिमेतून उमेदवारी अर्ज भरल्याची चर्चा होती. मंत्री पाटील विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात दिसत नव्हते.
हेही वाचा >>>पोलीस कोठडीतून फरार झालेला उत्तर प्रदेशातून अटकेत
मंत्री कपील पाटील यांची नाराजी. वरूण पाटील यांच्या उमेदवारीचा विश्वनाथ भोईर यांच्या मतदानावर परिणाम होणार होता. कपील पाटील यांनी नाराजी दूर करून विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारात त्यांनी सहभागी व्हावे यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठांकडून जोरदार प्रयत्न सुरू होते. वरूण यांच्या उमेदवारीचा महायुतीच्या उमेदवारीवर परिणाम होणार होता. विश्वनाथ भोईर मुख्यमंत्री समर्थक उमेदवार ओळखले जातात.
त्यामुळे शिंदे पिता-पुत्रांच्या खास समर्थकांनी कल्याणमध्ये रविवारी माजी मंत्री कपील पाटील यांची भेट घेतली. या चर्चेतून कपील पाटील यांनीही विश्वनाथ भोईर यांचे काम करण्याचे आश्वासन दिल्याचे शिवसेनेचे एका वरिष्ठाने सांगितले. कपील पाटील यांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने कल्याण पश्चिमेतील विश्वनाथ भोईर यांचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा >>>आम्ही पैसे लाटणारे नाही, तर जनतेचे पैसे जनतेला वाटणारे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर टीका
कपील पाटील-शिवसेनेतील रुसवेफुगवे, नाराजी नाट्य दूर झाल्याने दोन्ही पक्षातून समाधान व्यक्त करण्यात आले. शिवसेना, भाजपच्या वरिष्ठांनी या वृत्ताला दिला. याविषयी महायुतीचे नेते सोमवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करतील, असे शिवसेना, भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले. शिंदसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांना संपर्क केला. त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शिंदेसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी मात्र या मनोमिलनाचे छायाचित्र समाज माध्यमांवर सामाईक केले आहे.