अंबरनाथ : भाजपाची ताकद प्रत्येक राज्यामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा एकदा योगी आदित्यनाथ यांचे सरकार आले. गोव्यात देखील भाजपाने सत्ता स्थापन केली. महाराष्ट्रात मात्र आमची फसवणूक झाली. यामुळे भाजपाने या फसवणुकीचा बदला घेऊन महाराष्ट्रात भाजपा युतीचे सरकार आणले. अशी स्पष्टोक्ती केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. असे वक्तव्य करत महाराष्ट्रात झालेला सत्ताबदल हा भाजपामुळेच झाला असल्याची एकप्रकारे स्पष्ट कबुलीच अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. अनुराग ठाकूर यांचा कल्याण लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसापासून दौरा सुरु आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी मंगळवारी दुपारी अंबरनाथमधील  बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या अपडेट्स, एका क्लिकवर!

हेही वाचा : ठाणे खाडीकिनारी मार्गात खारफुटी बाधित होणार?; पर्यावरणप्रेमी आणि लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले प्रश्न

महाराष्ट्रातील काही निवडक लोकसभा मतदार संघात भाजपाची ताकद वाढविण्यासाठी नऊ केंद्रीय मंत्री राज्यातील विविध मतदारसंघांचा दौरा करणार आहे. या कार्यक्रमा अंतर्गत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे रविवारपासून कल्याण लोकसभा मतदारसंघात तळ ठोकून आहेत. अनुराग ठाकूर यांनी रविवार आणि सोमवार कल्याण – डोंबिवली शहरात दौरा केला. या दरम्यान त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटीगाठी घेतल्या. तसेच कल्याण भाजपा कडून देखील शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले होते. याच पद्धतीने अनुराग ठाकूर यांनी  मंगळवारी सकाळी ११ वाजल्यापासून अंबरनाथ शहराचा दौरा केला. यात अंबरनाथमध्ये देखील ढोलताशा वाजवत, खुल्या गाडीतून अनुराग ठाकूर त्यांची रॅली काढत भाजपाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. यावेळी त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटी  घेतल्या. तसेच शहरातील बूथ प्रमुखांशी संवाद साधला. यातील एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रात झालेल्या सत्ताबदलावर मोठे भाष्य केले. यावेळी ते कार्यकर्त्यांशी संवाद साधताना म्हणाले की देशातील भाजपाची ताकद दिवसागणिक वाढत आहे. जनात भाजपला प्रतिसाद देत आहे. यामुळे नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने विविध  राज्यांमध्ये स्थानिक पक्षांशी युती करून सत्ता स्थापन केली आहे. उत्तरप्रदेशमध्ये देखील योगी आदित्यनाथ पुन्हा निवडून आले आहेत. गोव्यात देखील भाजपाने सत्ता स्थापना केली आहे. महाराष्ट्रातही आपण युतीची सत्ता स्थापन केली असती. परंतु, भाजपाची महाराष्ट्रात फसवणूक झाली. मात्र भाजपाने या फसवणुकीचा बदला सत्तांतराने घेतला. सध्या सत्ता असली तरी  महाराष्ट्रात भाजपाची ताकद अधिक वाढवायची आहे. असेही ते म्हणाले. यावेळी अनुराग ठाकूर यांच्या समवेत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार संजय केळकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव  गुलाबराव करंजुले  उपस्थित होते.

हेही वाचा : कल्याण डोंबिवली पालिका फक्त ‘सेटींगमध्ये स्मार्ट, मग टक्केवारी असो की नवीन पुरस्कार’ ; मनसे आमदार प्रमोद पाटील यांची टीका

फेसबुक नेते नकोत

नेता तोच असतो ज्याच्या केवळ इशाऱ्याने शेकडोच्या संख्येने नागरिक गोळा होतात. त्यामुळे आपल्याला फेसबुक नेते नको आहेत. समाजामध्यम देखील नागरिकांशी जुळवून घ्यायचे एक साधन आहे. मात्र प्रत्येक मतदाराला व्यक्तीशः भेटून संवाद साधून सर्व कार्यकर्त्यांनी  भाजपाची ताकद वाढवायची आहे. असे ही अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenge scam maharashtra union minister anurag thakur statement ysh