कल्याण – कल्याण तालुक्यातील टिटवाळ्या जवळील कल्याण-मुरबाड रस्त्यावरील गोवेली येथील गुरचरण जमिनींवर उभारण्यात आलेली बेकायदा हाॅटेल्स, व्यापारी गाळे अशी एकूण २१ हून अधिक बेकायदा बांधकामे महसूल विभागाच्या पथकाने शनिवारी जेसीबीच्या आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने भुईसपाट केली.या कारवाईने गोवेली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या बांंधकामधारकांना महसूल विभागाने पूर्वसूचना नोटिसा दिल्या होत्या. मुख्य वर्दळीचे रस्ते अडवून ही बेकायदा बांधकामे स्थानिकांनी राजकीय आशीर्वादाने केली होती. गुरचरण जमिनीवरील सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात राज्य सरकारला दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाच्या आदेशावरून ही कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी कल्याणचे तहसीलदार सचीन शेजाळ यांना गोवेली येथील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाप्रमाणे तहसीलदार शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण, म्हारळ सजेच्या मंडळ अधिकारी प्रीती घुडे, नडगावच्या मंडळ अधिकारी दर्शना भावे, टिटवाळ्याचे चेतन पष्टे, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, या भागाचे तलाठी यांच्या उपस्थितीत शनिवारी सकाळी गोवेली येथील गुरचरण जमिनीवरील २१ व्यापारी गाळे, हाॅटेल्स जेसीबीच्या साहाय्याने आणि तोडकाम पथकाच्या साहाय्याने तोडून टाकण्यात आली.

हेही वाचा >>>डोंबिवलीत मुलाकडूनच आई-वडिलांच्या घरातील तिजोरीतील रोख रकमेची चोरी

गोवेली येथील गुरचरण जमिनी हडप करण्याची भूमाफियांंमध्ये मोठी स्पर्धा लागली होती. सरकारी जागेवर हे व्यावसायिक व्यवसाय करत असुनही शासनाला एक पैशाचा महसूल देत नव्हते. या जागाआपल्या मालकी हक्कासारख्या व्यावसायिकांकडून वापरल्या जात होत्या, असे स्थानिकांनी सांगितले. अशीच कारवाई कल्याण तालुक्यातील प्रत्येक गाव हद्दीतील गुरचरण जमिनीवर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

कल्याण तालुक्यात गुरचरण जमिनीवर जेथे व्यापारी गाळे, हाॅटेल्स आहेत अशी ठिकाणे निश्चित करून त्यांना नोटिसा देऊन ती बेकायदा बांधकामे तोडून टाकण्यात येणार आहेत.-सचीन शेजाळ ,तहसीलदार,कल्याण.

(टिटवाळ्याजवळील गोवेली येथील गुरचरण जमिनीवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त.)

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue department action against hotels clods on cattle lands in goveli near titwala kalyan amy
Show comments