दोनशे कोटींच्या थकबाकीसाठी महसूल विभागाची नोटीस
मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन केलेल्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या बांधकामाला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी स्थगिती दिल्याचे प्रकरण ताजे असतानाच महसूल विभागाने महानगरपालिकेला आणखी एक धक्का दिला आहे. सरकारी जमिनीचा प्रत्यक्ष वापर सुरू असल्याच्या बदल्यात जमीन महसूल नजराणा म्हणून मीरा-भाईंदर महानगरपालिकेकडे सुमारे दोनशे कोटी रुपयांची थकबाकी असल्याची नोटीस ठाणे तहसीलदारांनी पालिकेवर बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांच्या आत थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशारा तहसीलदारांनी दिला आहे.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत मौजे राई मुर्धे येथील सव्‍‌र्हे क्र. १२९, १३० हे खेळाचे मैदान, मौजे भाईंदर येथील सव्‍‌र्हे क्र. २२९, २३० हे नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, मौजे नवघर येथील सव्‍‌र्हे क्र. १५ ही जेसल पार्क चौपाटी तसेच उत्तननजीक चौक गावातील सव्‍‌र्हे क्र. ७/१अ/अ, ७/१/अ/ब या सरकारी जागांचा महानगरपालिकेकडून वापर सुरू असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. या जागांच्या मूल्यमापनाची रक्कम ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित केली असून ती १९५ कोटी ४६ लाख ८० हजार एवढी होत आहे. जमीन महसूल नजराणा म्हणून ही थकबाकी सात दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी महानगरपालिकेला बजावली आहे. ही थकबाकी न भरल्यास रक्कम वसुलीसाठी विधीनुसार कारवाई करण्यात येईल तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार थकबाकीच्या एकचतुर्थाश एवढी रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल. सदर मागणीची रक्कम दिलेल्या मुदतीत न भरल्यास जप्तीचे आदेश काढण्यात येतील, असे तहसीलदारांनी नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे.
संबंधित जागा संरक्षणासाठी महानगरपालिकेकडे हस्तांतर करण्यात आल्या होत्या. या जागेवर कोणत्याही प्रकारचे आरक्षण नव्हते, त्यामुळे जागेचा वापर सुरू करण्यापूर्वी महानगरपालिकेने चालू बाजारभावानुसार त्याची रक्कम महसूल विभागाकडे जमा क रणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे पालिकेला नोटीस जारी करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार विकास पाटील यांनी दिली.

Story img Loader