ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतकरी, विकासक सध्या जमिनीचे भोगवटा प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महसूल विभागात चकरा मारत आहेत. मात्र त्यांना हे प्रमाणपत्रच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शेतक ऱ्याला आपल्या मालकीच्या जमिनीवर घर किंवा अन्य बांधकाम करण्यासाठी तसेच जमिनीचा वापर बदलण्यासाठी अकृषीक परवान्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानग्यांची आवश्यकता नाही, असा निर्णय मध्यंतरी राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, अशा जमिनीवर बांधकाम करण्यापूर्वी जमिनीवरील संबंधित शेतक ऱ्याचा हक्क, त्या जमिनीवर काही बोजा आहे का? याची तपासणी नियोजन प्राधीकरणातील सक्षम अधिकारी करतील, असे निर्णय घेण्यात आलेला आहे. या तपासणीनंतरच संबंधित शेतकरी आणि विकसकाला त्याच्या जागेवर अकृषीक परवान्याचे पत्र मिळणार आहे. मात्र, नियोजन प्राधीकरणातील सक्षम अधिकारी कोण हे शासनाने निश्चित केले नसल्याने ठाणे जिल्ह्य़ाकील शेकडो शेतकरी, विकासक भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महसूल विभागात चकरा मारून मेटाकुटीला आले आहेत.
अकृषिक जमीन परवाना (एन. ए.), जमिनीचा वापर बदलासाठीच्या यापूर्वीच्या किचकट प्रक्रिया शासनाने सोप्या केल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी, ग्रामीण भागातील विकासकांनी आपल्या मालकी हक्काच्या जमिनी, भूखंड विकसित करण्यास सुरुवात केली आहे. शेतक ऱ्यांनी जमिनीचा वापर बदलण्यासाठी, विकसित करण्यापूर्वी अकृषिक परवान्यासाठी महसूल विभागातील तहसीलदार, प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केले आहेत. महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्याने अर्जदाराच्या कागदपत्रांची छाननी करून ती जागा संबंधित जमिन मालकाची आहे. त्यावर कोणताही बोजा नाही, असे जिल्हाधिकाऱ्याना कळवायचे आहे.
जिल्हाधिकाऱ्याने सक्षम अधिकाऱ्याच्या अहवालाप्रमाणे संबंधित जमीन मालक शेतकरी, विकासकाला जागावापर बदल, विकासासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र देईल, असे महसूल विभागाच्या अध्यादेशात म्हटले आहे. शासनाने जमीन वापर बदलाची प्रक्रिया सोपी, विनाखर्च केल्याने अनेक जमिन मालकांनी तहसीलदारांकडे आपल्या हक्काच्या जमिनीवर घर, बंगला, इमारत किंवा व्यापारी गाळे बांधणीसाठी अर्ज केले आहेत. या कागदपत्रांची नियोजन प्राधीकरण म्हणून महसूल विभागातील सक्षम अधिकाऱ्याने तपासणी करून जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल द्यायचा आहे. परंतु, नियोजन प्राधीकरणातील सक्षम अधिकारी कोण हे जिल्हाधिकाऱ्यापासून ते तलाठय़ापर्यंत कोणालाच माहिती नसल्याने शेतक ऱ्यांना आपल्या मालकीच्या जमिनीचे भोगवटा प्रमाणपत्र महसूल विभागाकडून गेल्या सहा महिन्यापासून मिळत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा