कल्याण – भिवंडी तालुक्यातील अंजुरदिवे, कशेळी, आलिमघर खाडी भागात दिवसरात्र बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांच्या १८ लाखाच्या बोटी, सक्शन पंप असे साहित्य शुक्रवारी सकाळी भिवंडी महसूल विभागाच्या पथकाने नष्ट केले. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईने वाळू व्यावसायिका, मजुरांची पळापळ झाली.

भिवंडी जवळील कशेळी, अंजुरदिवे खाडी भागात दिवस-रात्र वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारी भिवंडीचे तहसीलदार अभिजित खोले यांच्याकडे आल्या होत्या. या बेकायदा वाळू उपशाची खात्री केल्यानंतर उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या आदेशावरून तहसीलदार अभिजित खोले, खारबाव, कोन, अंजुर, काल्हेर येथील मंडळाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांनी शुक्रवारी सकाळी अचानक कशेळी, अंजुरदिवे खाडी भागात धाड टाकली. महसूल अधिकाऱ्यांची पथके आपल्या दिशेने येत आहेत याची चाहूल लागताच वाळू उपशांच्या बोटींवरील मजूर, त्यांचे प्रमुख बोटी, सक्शन पंप टाकून पळून गेले.

हेही वाचा >>>लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तालीम अंतिम टप्प्यात

या कारवाईच्यावेळी पथकाने आलिमघर येथे खाडी पात्रात उभे असलेले एक बार्ज, दोन सक्शन पंप कौशल्याने खाडी किनारी आणून तोडकाम पथकाच्या साहाय्याने नष्ट केले. काल्हेर येथे बंदर किनाऱ्याजवळ दोन सक्शन पंप नष्ट करण्यात आले. एका बार्जला कटरने छिद्र पाडून तो खाडीत बुडविण्यात आला. अशाप्रकारे वाळू व्यावसायिकांचे बार्ज, स्कशन पंप अशी एकूण १८ लाखाची मालमत्ता कारवाई पथकाने नष्ट केली. पथकाने या भागात वाळू व्यावसायिक, मजुरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ते पळून गेले होते. भिवंडी येथे कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळताच डोंबिवली मोठागाव, कोपर भागातील वाळू व्यावसायिक बोटी घेऊन खाडीतून पळून गेले.

हेही वाचा >>>कल्याणमधील कपोते वाहनतळावर पालिकेचा ताबा; भाडे थकविल्याने ठेकेदार काळ्या यादीत

भिवंडी जवळील खाडी भागात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या वाळू व्यावसायिकांवर नियमित कारवाई केली जाते. कशेळी, अंजुरदिवे भागात वाळू उपशाच्या तक्रारी आल्याने या भागात कारवाई करून वाळू व्यावसायिकांची १८ लाखाची मालमत्ता नष्ट केली. ही कारवाई यापुढेही नियमित सुरू राहणार आहे.- अभिजित खोले, तहसिलदार, भिवंडी.

Story img Loader