वाळू उपशामुळे वैतरणा पूल धोकादायक
वाळू उपाशामुळे वैतरणा पुलास धोका निर्माण झाल्याचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’ने देताच प्रशासन खडबडून जागे झाले आहेत. महसूलमंत्र्यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत, तर तहसीलदारांनी धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
पालघर जिल्ह्य़ात विरारजवळील वैतरणा खाडीवर पश्चिम रेल्वेचा पूल आहे. हा पूल पालघर, डहाणूसह गुजरात आणि उत्तरेकडील राज्यांना जोडतो. त्यामुळे हा पूल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या पुलाखालील खाडीत वाळू उपसा करण्यास पूर्णपणे बंदी आहे. मात्र तरीही वाळूमाफिया राजरोस या पुलाखालील वाळू उपसा करीत आहेत. त्यामुळे पुलाचा पाया खचून पुलाला धोका निर्माण झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता वसई-विरार’मध्ये प्रसिद्ध होताच त्याबाबत विधिमंडळात चर्चा झाली. विधान परिषदेत आमदार आनंद ठाकूर यांनी याबाबत प्रश्न विचारताच महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी बेकायदा वाळू उपसा होत असल्याचे मान्य केले, तसेच कारवाई करण्याचे आदेश पालघर जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
याबाबत बोलताना वसईचे तहसीलदार गजेंद्र पाटोळे यांनी सांगितले की, या पुलाच्या दोन्ही बाजूस ६०० मीटपर्यंत वाळू उपसा करण्यास बंदी आहे, मात्र तिथे बेकायदा रेती उपसा होत असतो. आम्ही वेळोवेळी कारवाई करून संक्शन पंप, बोटी आणि रेती जप्त करीत असतो. यापुढेही ही कारवाई अधिक जोमाने करण्यात येईल. पोलिसांनी या भागात गस्ती वाढवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
पश्चिम रेल्वे या वाळू उपशाविरोधात गेल्या पाच वर्षांपासून पत्रव्यवहार करीत आहे. वाळू उपशामुळे खाडीच्या पाण्याचा प्रवाह बदलत असून पुलासाठी तो अत्यंत धोकादायक आहे, असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.
वैतरणा खाडीत कारवाई करून रेती जप्त केली जाते. ही रेती जप्त करून त्याचा लिलाव केला जातो. मात्र वाळूमाफियाच लिलावात भाग घेतात आणि एक प्रकारे चोरलेला माल परत मिळवतात, असा आरोप आमदार आनंद ठाकूर यांनी केला आहे. या लिलावावर बंदी घातली तर वाळूमाफियांच्या मोठा जरब बसेल, असे ते म्हणाले. वाळू चोरी महसूल आणि पोलिसांच्या संगनमताने होत असल्याचे ते म्हणाले.