भगवान मंडलिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील काही महिन्यांपासून डोंबिवली, मुंब्रा, कल्याण, भिवंडीजवळील खाडीत दिवस-रात्र वाळूचा बेकायदा उपसा करणाऱ्या वाळू माफियांना सोमवारी सकाळी महसूल अधिकाऱ्यांनी अचानक डोंबिवली, कोपर, मुंब्रा खाडीत घेरले. वाळू माफियांच्या उपसा बोटी, सक्शन पंप अशी सुमारे ३० लाखांहून अधिक किंमतीची सामग्री गॅस कटरने तोडून खाडीत बुडवली. आपल्यावर कारवाई होणार हे समजतात उपसा बोटीवरून वरून उड्या मारून १० हून अधिक माफिया पोहत खाडी किनारी जाऊन पसार झाले.

एकदम फिल्मी स्टाइर पद्धतीने हे कारवाईचे नाट्य घडले. कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख, रेती गट विभागाचे ठाणे प्रमुख महेश भोइर यांनी वाळू माफियांवरील कारवाई विषयी गुप्तता बाळगली होती. बोटीतून माफियांचा पाठलाग करुन त्यांना पकडायचे अशी तयारी देशमुख यांनी केली होती. कारवाईसाठी पाच पथके होती. सोमवारी सकाळी तहसीलदार देशमुख, रेती गटाचे भोईर, डोंबिवलीचे मंडल अधिकारी दिपक गायकवाड, तलाठी यांचा ताफा जेसीबी, गॅस कटर सामग्रीसह कोपर, डोंबिवली, रेतीबंदर, गणेश नगर, अंजुर दिवे खाडीकिनारी पोहोचले. खाडीमध्ये वाळू उपसा जोमाने सुरू होता.

कारवाई बोटीतून अधिकाऱ्यांनी वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या बोटीच्या दिशेने प्रवास सुरू केला. कारवाई पथक आपल्या दिशेने येत आहे हे दिसताच माफियांनी उपसा बोटीतून उड्या मारल्या आणि खाडीकिनारी पळून गेले. कारवाई बोटीतील तहसीलदार देशमुख यांच्यासह कर्मचाऱ्यांनी माफियांच्या बोटीत प्रवेश केला. उपसा बोटीची गती कमी करून त्यामधली यंत्रसामुग्री गॅस कटरने तोडून टाकली, बोटीचे फाळके गॅस कटरने तोडून टाकले. अशी एकेक करून १० वाळू उपसा बोटी अधिकाऱ्यांनी खाडीत बुडवल्या, अशी माहिती तहसीलदार देशमुख यांनी दिली.

खाडीकिनारचे २० हून अधिक वाळू साठवण हौद जेसीबीने तोडून टाकण्यात आले. मुंब्रा येथील अली, कल्याणचा शकाप हे वाळू माफिया रेती उपशामधे अग्रेसर असल्याची माहिती महसूल अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष

विष्णुनगर पोलीस ठाणे हद्दीत दिवस-रात्र खाडीत बेकायदा वाळू उपसा सुरू असताना स्थानिक पोलिस अधिकारी आणि गस्तीवरील पोलीस माफियाविरुद्ध कारवाई करत नसल्याने पर्यावरण प्रेमी कडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

बातमीची दखल

डोंबिवली खाडीत रात्री वाळू उपसा करून 20 वाळू माफिया मुंब्रा खाडीत दिवसा कारवाई टाळण्यासाठी लपून बसत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ सह दैनिकाने दिले होते. या वाळू उपशावरून जळगावचे आमदार सुरेश भोळे यांनी शासनाला प्रश्न करून माफियांवर कारवाईची मागणी विधिमंडळात केली होती. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशावरून महसूल अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

कारवाई सुरूच राहणार

“डोंबिवली परिसरात वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या बोटी बुडून टाकण्यात आल्या आहेत. यंत्रसामग्री नष्ट केली. वाळू हौद साठे उद्ध्वस्त केले आहेत. वाळू माफियांवर कारवाई यापुढे सतत सुरू ठेवली जाणार आहे,” अशी माहिती कल्याणचे तहसीलदार जयराज देशमुख यांनी दिली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Revenue offficials action agaisnt sand mafia in thane sgy