वसईत यंदा तहसील महसूल विभागाकडून ५७ टक्केच वसुली
गेल्या वर्षी वसई तहसीलदार महसूल विभागाने एकूण ८४ टक्के कर वसुली केली असली तरी मात्र यावर्षी ५७,२६ टक्के इतकीच वसुली झाल्याने चालू आर्थिक वर्षांत वसुली थंडावली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता तहसील विभागाकडून जास्तीत जास्त वसुली करण्यासाठी धावपळ सुरू झाली असून अद्याप ६५ कोटींचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या तीन वर्गात महसुली उत्पन्न गोळा केले जाते. ‘अ’ वर्गात अकृषिक, बिगरशेती, जमिन, भूसंपादन आदी विभागातील महसूल गोळा केला जातो. ‘ब’ वर्गात गौण खनिज, रेती लिलावाद्वारे महसूल गोळा केला जातो तर ‘क’ वर्गात विविध करमणूक करांद्वारे महसूल गोळा केला जातो. वसुलीचे उद्दीष्ट गाठता यावे यासाठी प्रयत्न झाले नसल्याने ५७ टक्के इतकीच वसुली झाल्याचे दिसून येत आहे.
‘अ’ वर्गात ३० कोटींचे तर ‘ब’ मध्ये ३४ असे उद्धिष्ट ठेवण्यात आले आहे, मात्र त्यामानाने ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या वर्गवारी नुसार एकूण कर वसुली हि ३७ कोटी रुपये इतकीच झाली आहे.गेल्यावर्षी ७६ कोटीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते तर या २०१७ – १८ आर्थिक वर्षांत मात्र ६५ कोटी लक्ष्य महसूल विभागाने ठेवले आहे. गौण खनिज वसुली यंदा सर्वाधिक कमी म्हणजे ३० टक्के इतकीच झाली आहे तर सर्वाधिक ५८ टक्के वसुली अकृषिक, भूसंपादन यातून झाली आहे, तर एकूण सरासरी आकडा मात्र या चालू आर्थिक वर्षांत घसरला असून ५७ टक्के इतकीच वसुली झाली आहे.
त्यामुळे गेल्या वर्षीपेक्षा २७ टक्के वसुली कमी झाल्याचे दिसून येत आहे. आकडेवारी पाहता या वर्षी तहसीलदारच्या महसूल विभागाची वसुली थंडावली आहे. त्यामुळे महसूल उत्पन्नाचा शासनाच्या तिजोरीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. आता मार्च अखेपर्यंत ६५कोटीचे उद्धिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाची धावपळ सुरू झाली आहे.
गेल्या वर्षी आम्ही करवसुलीसाठी त्या त्या ठिकाणी जाऊन वसुली केली होती, तसेच त्याच वेळी कारवाईही केली होती. त्यानंतर कारवाई केल्याच्या विरोधात संबंधितांनी तहसील कार्यालयावर मोर्चाही काढला होता, परंतु यंदा अशी कारवाई करण्यात आली नसून येत्या ३१ मार्चपर्यंत ही वसुली पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
– स्मिता गुरव, नायब तहसीलदार