खोडकिडा, तुडतुडाच्या प्रादुर्भावानंतरही सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष; शेकडो एकर भातशेतीचे नुकसान

पावसाचा मुक्काम लांबल्याने आधीच संकटात सापडलेल्या भातपीकाला खोडकिडा आणि तुडतुडा रोगाने ग्रासले आहे. याविषयी वारंवार अर्ज-विनंती करूनही सरकारी अधिकारी लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या मुरबाड तालुक्यातील खुटल ग्रामपंचायत हद्दीतील दिघेफळ येथील शेतकऱ्यांनी अखेर बुधवारी उभे भातपीक पेटवून दिले.

यंदा पावसाचा मुक्काम थेट दिवाळीपर्यंत लांबल्याने कोकणातील भातशेती संकटात सापडली होती. आता पावसाने माघार घेतली असली तरी, भातपीकावर खोडकिडा रोगाची लागण झाली आहे. मुरबाड तालुक्यातील खुटल ग्रामपंचायत हद्दीतील दहिफळ येथील शेतकऱ्यांनी याप्रकरणी स्थानिक तहसीलदार, कृषी अधिकारी यांना कळवले. मात्र कोणत्याही विभागाने या शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. ‘ठरावीक नावाचे औषध फवारा’ असे थातुरमातुर उत्तर देत अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना टाळण्याचा प्रयत्न केला.

सरकारदरबारी अशी टाळाटाळ सुरू असतानाच तुडतुडा रोगामुळे भातपीकातील दाणे सडले. हाती आलेले पीक कुजल्याने चार महिन्यांची मेहनत आणि आर्थिक नुकसान मोठय़ा प्रमाणावर झाल्याने हताश झालेल्या शेतकऱ्यांनी भातपीक पेटवून दिले आहे. दहिफळ पाडय़ात जवळपास ५० एकर भात शेती असून आसपासच्या वाडय़ा आणि गावे मिळून शेकडो एकर भातशेतीचे नुकसान झाले आहे तर संपूर्ण मुरबाड आणि शहापूर तालुक्यात अशाच प्रकारे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

‘आम्ही वाडा कोलम आणि रुपाली या भातवाणाची पेरणी केली होती. परंतु आधी पाऊस आणि नंतर रोगाने संपूर्ण शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे ही शेती पेटवून दिली,’ अशा शब्दांत भगवान भला या शेतकऱ्याने हतबलता व्यक्त केली. ‘आमच्या कुटुंबात नऊ सदस्य असून जनावरेही आहेत, आमचे भाताचे पूर्ण पीक वाया गेल्याने आता वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे मंगल महादेव भला यांनी सांगितले.

पंचनामा, पीक विमा नाहीच

भातशेतीच्या नुकसानीबाबत कृषी अधिकाऱ्यांना कळविले असतानाही पिकांचा पंचनामा न झाल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. नॅशनल इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड या कंपनीतून शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. पीक कर्ज घेत असतानाच पीक विम्याचे पैसे कापले गेले. मात्र आता कंपनीकडून प्रतिसादच दिला जात नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.

चाऱ्याचाही प्रश्न

भात पीक कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यात हे पीक पूर्ण नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. हे पीक काढल्यानंतर उरलेले गवत चाऱ्यासाठी वापरले जात होते. मात्र आता हा चाराही हातून गेल्याने गुरांना काय द्यायचे, हा प्रश्नही समोर उभा ठाकला आहे.