डोंबिवली – डोंबिवली पश्चिमेत अनेक रिक्षा चालक रिक्षा वाहनतळ सोडून रेल्वेचे प्रवेशव्दार, मुख्य वर्दळीच्या रस्ते, चौकात उभे राहून नियमबाह्यपणे प्रवासी वाहतूक करतात. या घुसखोर रिक्षा चालकांकडे रिक्षेची कागदपत्रे, बिल्ला, परवाना नसतो. विशेष म्हणजे हे रिक्षा गणवेशात नसतात. अशा घुसखोर रिक्षा चालकांमुळे रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय होत आहे. या घुसखोर रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी रिक्षा चालक मालक संघटनेतर्फे डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ निदर्शने करण्यात आली.

ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे, उपाध्यक्ष शेखर जोशी, विश्वंभर दुबे, सरचिटणीस भिकाजी झाडे, सुरेंद्र मसाळकर, कैलास यादव सहभागी झाले होते. रिक्षा संघटनेचे सदस्य रिक्षा चालक या आंदोलनात सहभागी झाले होते.

घुसखोर रिक्षा चालक आयुर्मान संपलेली भंगार रिक्षा किंवा मूळ मालकाची रिक्षा भाड्याने घेऊन प्रवासी वाहतूक करतात. या रिक्षा चालकांकडे प्रवासी वाहतुकीचा कोणताही परवाना नसतो. ते गणवेशात नसतात. रिक्षेची कागदपत्रे या रिक्षा चालकांकडे नसतात. हे रिक्षा डोंबिवली पश्चिमेत वर्दळीचे रस्ते, रेल्वेच्या प्रवेशव्दारांवर उभे राहून प्रवासी वाहतूक करतात. मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. घुसखोर रिक्षा चालक प्रवाशाशी उध्दट वागला, त्याने भाडे नाकरले, वाढीव भाडे आकारले तरी सरसकट सर्व रिक्षा चालक त्यात दोषी धरले जातात. अशा घुसखोरांवर आरटीओ, वाहतूक विभागाने कारवाई करावी, असे रिक्षा संघटनेचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी सांगितले.

घुसखोर रिक्षा चालकांवर कारवाई करावी म्हणून आम्ही गेल्या आठवड्यात रिक्षा चालक मालक संघटनेने डोंबिवली वाहतूक विभागाला पत्र दिले होते. मुख्य वर्दळीच्या रस्ते, चौकात वाहतूक पोलीस तैनात करावेत. जेणेकरून घुसखोर रिक्षा चालकांना जरब बसेल, अशी मागणी केली होती. वाहतूक विभागाकडून त्याची दखल घेण्यात येत नसल्याने हे आंदोलन करावे लागले, असे उपाध्यक्ष शेखर जोशी यांनी सांगितले.

रिक्षा चालक रिक्षा बंद ठेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते. वाहतूक विभागाने या आंदोलनाची दखल घेतली नाहीतर रिक्षा संघटनेने रिक्षा बेमुदत बंद ठेवण्याची तयारी केली होती. या आंदोलनाची माहिती मिळताच वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त संजय साबळे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील आंदोलन स्थळी आले. साहाय्यक आयुक्त साबळे यांनी येत्या आठवड्यात डोंबिवली पश्चिमेत उपलब्ध मनुष्यबळ पाहून वाहतूक पोलीस तैनात करण्याची व्यवस्था करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले.

रिक्षेची कागदपत्रे जवळ नसलेले, गणवेशात नसलेले अनेक रिक्षा चालक डोंबिवली पश्चिमेत प्रवासी वाहतूक करत आहेत. अशा रिक्षा चालकांमुळे रिक्षा वाहनतळावर उभे राहून प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर अन्याय होतो. त्यामुळे घुसखोर रिक्षा चालकांवर दररोज आरटीओ, वाहतूक विभागाकडून कारवाई झाली पाहिजे. यासाठी आंदोलन करण्यात आले.- दीपश म्हात्रे जिल्हाप्रमुख, ठाकरे गट.