कल्याण पश्चिमेत एका व्यावसायिकाने आणि त्याच्या कामगारांनी वाहन उभे करण्याच्या विषयावरुन एका रिक्षा चालकाला सोमवारी बेदम मारहाण केली. बाजारपेठ पोलीस ठाण्यात याप्रकरणी रिक्षा चालकाने तक्रार केली आहे. पाईप कारखान्याचे रवी गवळी, कामगार अनिकेत, मोहन, ललित (पूर्ण नावे नाहीत) अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी सकाळी राम मारुती रस्त्या वरील इंग्लिश प्ले ग्रुप शाळेसमोर हा मारहाणीचा प्रकार घडला. शेख हाझी (२७) हा रिक्षा चालक लाल चौकी येथील फंगारी चाळीत राहतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- भिवंडी जवळील टाटा आमंत्रा करोना केंद्रातून पळालेला मोक्कातील गुन्हेगार दोन वर्षांनी अटक

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार रिक्षा चालक शेख हाझी यांनी आपली रिक्षा कल्याण पश्चिमेतील राम मारुती रस्त्यावरील इंग्लिश प्ले ग्रुप शाळेसमोर उभी केली होती. ते बाजुला गेले होते. ते पुन्हा रिक्षेजवळ आले त्यावेळी त्यांना आपली रिक्षा मूळ जागेऐवजी दुसऱ्या जागेत कोणीतरी उभी केली असल्याचे दिसले. मूळ जागी पाईप कारखान्याचे मालक रवी गवळी यांची जीप उभी होती. शेख यांनी व्यावसायिक गवळी यांना रिक्षेची जागा बदलण्याबाबत विचारणा केली. त्यावेळी व्यावसायिक रवी गवळी यांनी रिक्षा चालक शेख यांना शिवीगाळ सुरू केली. त्यांच्या कारखान्यातील कामगार अनिकेत याने सिमेंट, पत्र्याच्या तुकड्याने शेखवर हल्ला केला.

हेही वाचा- रिकॅलिब्रेशनसाठी मुदतवाढ देण्याची रिक्षा महासंघाची कल्याण ‘आरटीओ’कडे मागणी

भांडण वाढेल म्हणून शेख तेथून रिक्षेसह निघत असताना कारखान्यातील मोहन, ललित यांनीही चालकाला मारहाण केली. किरकोळ कारणावरुन शिवीगाळ आणि मारहाण झाल्याने रिक्षा चालक शेख हाझी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक के. पी. अहिरे तपास करत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw driver assaulted by businessman in kalyan dpj