ठाणे – भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याच्या परिसरात एका व्यक्तीने रिक्षा चोरीला गेली असून पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप करत स्वत:ला जाळून घेतल्याचा प्रकार सोमवारी रात्री उघडकीस आला. त्याची रिक्षा चोरीला गेली नसून ती अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीने जप्त केली असल्याची माहिती नारपोली पोलिसांनी दिली. त्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भिवंडी येथे रिक्षा चालक राहत असून त्याने गेल्यावर्षी त्याची रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार नारपोली पोलीस ठाण्यात दिली होती. सोमवारी रात्री रिक्षा चालक नारपोली पोलीस ठाण्यात आला होता. त्यावेळेस त्याने पोलिसांसोबत वाद घालण्यास सुरूवात केली. तसेच पोलिसांच्या ११२ मदत क्रमांकावरही संपर्क साधला. त्यानंतर तो पोलीस ठाण्याच्या बाहेर पडला आणि त्याने अंगावर रासायनिक पदार्थ ओतून जाळून घेतले. पोलिसांनी तात्काळ त्याला अडवून रुग्णालयात दाखल केले. संबंधित व्यक्ती २२ टक्के भाजले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान त्याची रिक्षा ही अर्थपुरवठा करणाऱ्या कंपनीने जप्त केल्याचा माहितीही पोलिसांनी दिली.