डोंबिवली – डोंबिवलीत सोमवारी एका ३० वर्षाच्या गतिमंद महिलेवर एका रिक्षा चालकाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. सोमवारी घडलेल्या या प्रकारानंतर पीडित महिलेने बुधवारी टिळकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून घेतला. घटना घडल्याच्या ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला अटक केली आहे. या रिक्षा चालकाला पोलिसांनी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती, अशी की डोंबिवलीतील गतिमंद महिलेला सोमवारी शिळफाटा रस्त्याजवळील सोनारपाडा गावात आपल्या नातेवाईकाकडे जायचे होते. या गतिमंद महिलेने एका रिक्षेतून सोनारपाडा दिशेने प्रवास सुरू केला. रिक्षा चालकाने गतिमंद महिलेच्या अपंगत्वाचा गैरफायदा घेत महिलेला तिने सांगितलेल्या इच्छित स्थळी रिक्षा न नेता मुंब्रा भागातील एका निर्जन स्थळी रिक्षा नेली. तेथे रिक्षा चालकाने आपल्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी पीडित महिलेची तक्रार आहे.

रिक्षा चालकाच्या या कृत्याने गतिमंद महिला संतप्त झाली होती. या पीडितेने घडला प्रकार आपल्या नातेवाईकांना कळविला. या पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिसांनी रिक्षा चालका विरुध्द तक्रार नोंदून घेतली. पोलिसांसमोर लैंगिक अत्याचार करणारा रिक्षा चालक पकडण्याचे मोठे आव्हान होते.

टिळकनगर पोलिसांनी उपायुक्त अतुल झेंडे, साहाय्यक आयुक्त सुहास हेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत ज्या ठिकाणी पीडित महिला रिक्षेत बसली. त्या ठिकाणापासून ते सोनारपाडा भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यावेळी एक रिक्षा चालक पीडितेला सोनारपाडा दिशेने रिक्षेतून नेत असल्याचे पोलिसांना सीसीटीव्ही चित्रणात आढळून आले.

टिळकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार कदम यांनी रिक्षाचा वाहन क्रमांक सीसीटीव्ही चित्रणात मिळताच, पोलीस पथकाने त्या रिक्षा चालकाचा शोध डोंबिवली परिसरात सुरू केला. पहिले त्या रिक्षा चालकाच्या घराचा पत्ता, मोबईल क्रमांक मिळविण्यात पोलिसांना यश आले. तांत्रिक माहितीच्या आधारे टिळकनगर पोलिसांच्या पथकाने बुधवारी रात्री दिवा येथून रिक्षा चालकाला अटक केली. फैझल खान असे रिक्षा चालकाचे नाव पोलिसांना तपासात आढळून आले.

रिक्षा चालकाची न्यायालयात बाजू मांडणारे वकील ॲड. अनिरूध्द कुलकर्णी यांनी माध्यमांना सांगितले, घटना घडल्याच्या दोन दिवसांनी याप्रकरणी प्राथमिक तपासणी अहवाल टिळकनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. ७ एप्रिल रोजीची ही घटना आहे. या घटनेत तथ्य वाटत नाही. रिक्षा चालकाचा या प्रकरणात काही सहभाग नाही, असे आम्ही न्यायालयाला सांगितले आहे. तपासाचा भाग म्हणून न्यायालयाने रिक्षा चालकाला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. टिळकनगर पोलिसांनी तातडीने याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.