खड्डयांमुळे रिक्षेच्या यंत्रांमध्ये बिघाड, सुट्टे भाग खिळखिळे होत असल्याने रिक्षेवर खर्च करून दमछाक होत असलेले रिक्षा चालक रात्रीच्या वेळेत रिक्षा बंद पडली तर प्रवासी आणि स्वत:ला त्रास सहन करावा लागू नये म्हणून सायंकाळी सात वाजता घरी परतत आहेत. त्यामुळे कामावरून परतणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका रस्त्यावर यापूर्वी दिवसभरात १० ते १५ फेऱ्या प्रवासी वाहतुकीसाठी होत होत्या. त्या आता खड्डे, कोंडीमुळे सात ते आठ होतात. रिक्षेमधील यंत्रांचा भाग खड्ड्यात आपटून खराब झाला तर दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. दिवसा प्रवासी वाहतूक करताना खड्डे चुकविता येतात. सायंकाळी सात नंतर अंधार पडतो. अनेक रस्त्यांवर पथदिवे नसतात. रिक्षा चालकांना खड्ड्यांमधून आदळआपट करत रिक्षा चालवावी लागते, असे चालकांनी सांगितले.

दिवसभरात प्रवासी वाहतुकीमधून जे पैसे मिळतात त्यामधून उपजीविका करतो. बहुतांशी रिक्षा कर्जाऊ रकमेतून घेतल्या आहेत. त्या कर्जाचा नियमित हप्ता फेडला गेला पाहिजे. दिवसभराची कमाई रिक्षा दुरुस्तीवर खर्च होऊ लागली तर कुटुंबगाडा, कर्ज हप्ता फेड कशी करायची असा प्रश्न रिक्षा चालकांनी उपस्थित केला. रस्ते सुस्थितीत होत नाहीत तोपर्यंत सकाळी सहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रवासी वाहतूक करायची असे ठरविले आहे, असे डोंबिवली, कल्याण मधील रिक्षा चालकांनी सांगितले.

प्रवासी रांगेत

बहुतांशी रिक्षा चालक खड्डे, कोंडीचा विचार करून सायंकाळी सात वाजता घरी जात असल्याने रिक्षा वाहन तळांवर कमी संख्येने रिक्षेने उभ्या असतात. या रिक्षा प्रवासी वाहतुकीसाठी गेल्यानंतर रस्त्यावरील खड्डे, कोंडीमुळे परतण्यास उशीर होतो. तोपर्यंत प्रवाशांना रिक्षेची वाट पाहत ताटकळत रहावे लागते. काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा वाहनतळांवर ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतून दीड ते दोन तासाचा प्रवास करून यायचे आणि पुन्हा रिक्षेच्या रांगेत ताटकळत रहावे लागत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

खड्ड्यांमुळे रिक्षेच्या सुट्टया भागांची मोडतोड होते. दिवसभराची प्रवासी वाहतुकीतील कमाई रिक्षा दुरुस्तीसाठी खर्च करावी लागते. दिवसा खड्डा चुकवून प्रवासी वाहतूक करता येते. रात्रीच्या वेळेत खड्ड्यात पाणी असेल तर रिक्षा आपटून आर्थिक नुकसान होते. सध्या दिवसभरात प्रवासी वाहतूक करतो.-अरुण कोचरेकर,रिक्षा चालक
एका रस्त्यावर यापूर्वी दिवसभरात १० ते १२ फेऱ्या मारतो. खड्डे, कोंडीमुळे हे प्रमाण कमी झाले आहे. नोकरदार घरी गेला की प्रवासी मिळणे अवघड होते. सध्या बहुतांशी चालक लवकर घरी जातात.-अजित मानकामे ,रिक्षा चालक

खड्ड्यात रिक्षा आपटून यंत्र खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. दररोज १५ ते २० रिक्षा दुरुस्तीसाठी येतात.- सुरेश आंगणे, रिक्षा तंत्रज्ञ
खड्ड्यांमुळे रिक्षेच्या आतील यांत्रिक यंत्रणा खिळखिळी होते. एखादा सुट्टा भाग खराब झाला की संपूर्ण रिक्षेची यांत्रिक दुरुस्ती चालकाला करावी लागत आहे. दोन हजार ते पाच हजारापर्यंत खर्च त्यासाठी येतो.– विवेक परब ,रिक्षा तंत्रज्ञ

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw drivers home by 7pm due to potholes in dombivli kalyan amy
Show comments