लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रामनगर तिकीट खिडकी, डाॅ. राॅथ रस्ता रेल्वे जिन्याजवळ पहाटेपासून अनेक रिक्षा चालक वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी रिक्षा उभ्या करतात. या बेकायदा वाहनतळामुळे प्रवाशांना या भागातून येजा करणे अवघड होते.
रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घुसखोर रिक्षा चालकांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. डोंबिवली वाहतूक विभागाचे कर्मचारी सकाळी आठ वाजल्यापासून वाहतूक नियोजनासाठी रस्त्यावर, चौकात असतात. त्यामुळे वाहतूक पोलीस तैनात होण्यापूर्वीच सकाळी सहा ते आठ वाजेपर्यंत अनेक रिक्षा चालक झटपट प्रवासी मिळावेत म्हणून रामनगर तिकीट खिडकी, डाॅ. राॅथ रस्त्यावरील लक्ष्मी रुग्णालयासमोरील रस्त्यावर रिक्षा उभ्या करून प्रवासी वाहतुकीसाठी सज्ज असतात.
हेही वाचा… ठाणे जिल्हातील बाजार समिती निवडणुकीत १४६ उमेदवार; युती, आघाडीत बिघाडी
सकाळच्या वेळेत अनेक नागरिक आपल्या घरातील सदस्याला रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीने सोडण्यासाठी आलेले असतात. त्यांनाही या रिक्षांमुळे रेल्वे स्थानकापर्यंत येता येत नाही. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.
डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते वाहनतळ सोडून कोणी रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असेल, तो वाहतुकीला अडथळा करत असेल तर त्याच्यावर ते तात्काळ कारवाई करतात. तसे आदेश त्यांनी आपल्या वाहतूक कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे दिवसभरात रेल्वे स्थानकातील जिन्याजवळ, रस्त्यावर रिक्षा उभे करण्याचे धाडस कोणी करत नाही.
सकाळी आठ वाजण्यापूर्वी रिक्षा चालकांची मनमानी असल्याने रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अशा रिक्षा चालकांना समज द्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत. मंगळवारी सकाळी अशाचप्रकारे घुसखोर रिक्षा चालक रामनगर रेल्वे तिकीट खिडकी भागात रस्ता अडवून उभे होते. एका जागरुक प्रवाशाने ही माहिती वाहतूक विभागाचे निरीक्षक गित्ते यांना दिली. त्यांनी तात्काळ हवालदार घटनास्थळी पाठवून संबंधित रिक्षा चालकांना तेथून तंबी देऊन हटविले. पुन्हा अशा पद्धतीने रस्ता अडवून कोणी रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अधिकाऱ्याने दिला.