कल्याण – कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील रिक्षा वाहनतळावरील रिक्षा चालक लालचौकी येथे जाणाऱ्या प्रवाशांना भाडे नाकारून याच चौकातून पुढे जाणाऱ्या उंबर्डे श्री काॅम्पलेक्स येथील प्रवाशांना प्राधान्य देत असल्याच्या वाढत्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. रिक्षा चालकांच्या या नियमितच्या नकारघंटेमुळे दररोज लालचौकीकडे जाणारे प्रवासी तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी यांनी अशा भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

कल्याण पश्चिमेतील लालचौकी भागात शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापना यांची कार्यालये आहेत. ठाणे, मुंबई, डोंबिवली परिसरातून येणारा नोकरदार कल्याण रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर लालचौकीकडे जाणाऱ्या रिक्षेने प्रवास करण्याचा प्रयत्न करतात. रिक्षा वाहनतळावर गेल्यावर लालचौकी भाडे विचारल्यावर रिक्षा चालक मागील रिक्षेत बसा, असा सल्ला देतात. अशाप्रकारे चार ते पाच रिक्षा चालक लालचौकी भाडे घेण्यास दररोज नकार देत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या.

हे नकारघंटा वाजवणारे रिक्षा चालक लालचौकीतून पुढे उंबर्डेकडे असलेल्या श्री काॅम्पलेक्स भागात जाणाऱ्या प्रवाशांना मात्र प्राधान्य देतात. लालचौकीकडे जाणारा प्रवासी रिक्षेत बसला असेल. त्याचवेळी श्री काॅम्पलेक्सकडे जाणारे प्रवासी आले की रिक्षा चालक लालचौकीकडे जाणाऱ्या प्रवाशाला रिक्षेतून खाली उतरवून त्याला दुसऱ्या रिक्षेने जाण्याचा सल्ला देत असल्याचे प्रकार नियमित कल्याण पश्चिम वाहनतळावर घडत आहेत. रिक्षा संघटना, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वाहतूक अधिकारी या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे.

आता परीक्षांचा हंगाम सुरू आहे. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थी, शिक्षकांना वेळेत पोहचायचे असते. काहींना कार्यालयात वेळेत जायाचे असते. परंतु, रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे शाळा, महाविद्यालयात वेळेत पोहचता येत नाही, अशा तक्रारी प्रवाशांनी केल्या. दररोजचे रिक्षा चालकांबरोबर वाद घालून कंटाळा आला आहे, असेही काही प्रवाशांनी सांगितले. भाडे नाकारणाऱ्या रिक्षा चालकांचा वाहन क्रमांक प्रवाशांंनी आरटीओच्या संकेतस्थळ किंवा व्हाटसप क्रमांकावर पाठवावा. त्या रिक्षा चालकांवर कारवाई केली जाईल, असे उपप्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष नवले यांनी सांगितले, कल्याण मधील रिक्षा वाहनतळावर लालचौकी, खडकपाडा येथे जाण्यासाठी रिक्षांच्या रांगा असतात. श्री काॅम्पलेक्सकडे जाणाऱ्या रिक्षांना रस्त्यावर उभे राहावे लागते. त्यामुळे हे रिक्षा चालक लालचौकी वाहनतळावर येतात. श्री काॅम्पलेक्सकडे जाणाऱ्या प्रवाशांना प्राधान्य देतात. या प्रकाराविषयी आरटीओ, वाहतूक विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा विषय मार्गी लागेल. लालचौकीकडे जाणाऱ्या प्रवाशांची परवड थांबेल.

लालचौकीकडे जाणाऱ्या प्रवाशांना भाडे नाकारले जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. याविषयी आरटीओ, वाहतूक विभागाकडे आम्ही तक्रारी केल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्प पूर्ण झाल्यावर हा विषय मार्गी लागेल. – संतोष नवले, कार्याध्यक्ष, रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना, कल्याण.