कल्याण- कल्याण पूर्व सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळांवरील रिक्षा चालकांनी बुधवारी सकाळ पासून रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ रिक्षा बंद ठेऊन आंदोलन सुरू केले आहे. चालकांनी अचानक रिक्षा बंद ठेवल्याने कल्याण पूर्व विविध भागात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. प्रवाशांना इतर वाहनतळावर जाऊन किंवा विशेष रिक्षा करुन इच्छित स्थळी जावे लागत आहे.
हेही वाचा >>>टिटवाळ्याजवळील सिग्नल बिघाडामुळे लोकल उशिरा
कल्याण रेल्वे स्थानकातून पूर्व भागात जाण्यासाठी कोळसेवाडी, सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळ आहेत. सिध्दार्थनगर वाहनतळांवर रिक्षा चालक ५० वर्षापासून प्रवासी वाहतूक करतात. वाहनतळाची जागा रेल्वेच्या जागेत येते. रेल्वे स्थानकातून बाहेर आलेला स्कायवाॅक सिध्दार्थनगर रिक्षा वाहनतळा जवळ उतरतो. त्यामुळे प्रवाशांना रिक्षा पकडून घरी जाणे सोयीचे होते. गेल्या काही दिवसांपासून रेल्वे प्रशासनाने सिध्दार्थनगर वाहनतळावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांना या वाहनतळाच्या मुख्य प्रवेशव्दाराच्या ठिकाणी आम्ही संरक्षक भिंत बांधणार आहोत. तुम्ही तुमच्या रिक्षा रेल्वे जागेच्या बाहेर लावा, अशी सूचना केली. सिध्दार्थ वाहनतळावरुन सुमारे तीनशेहून अधिक रिक्षा चालक रांगेतून प्रवासी वाहतूक करतात. प्रवासी या रिक्षेतून कल्याण पूर्वेतील शहराच्या विविध भागात जातात, असे रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी संघटनेचे कल्याण अध्यक्ष विशाल म्हस्के यांनी सांगितले.
हेही वाचा >>>कल्याण मधील कोटक महिंद्रा बँकेत बनावट नोटा जिरवण्याचा ग्राहकाचा प्रयत्न
रेल्वेने भिंत बांधून वाहनतळाचा रस्ता बंद केला तर रिक्षा उभ्या करायच्या कोठे आणि प्रवासी वाहतूक करायची कोठुन, असा प्रश्न रिक्षा चालकांना पडला आहे. रस्त्यावर एकावेळी तीनशे रिक्षा उभ्या करुन प्रवासी वाहतूक करणे शक्य नाही, असे अध्यक्ष विशाल म्हस्के यांनी सांगितले. रेल्वे प्रशासनाने आता रिक्षा वाहनतळ हटाव म्हणून तगादा लावला आहे. एकावेळी सहाशे रिक्षा चालक कुठे जाऊन प्रवासी वाहतूक करणार. इतर वाहनतळांवर आम्हाला कोणी उभे करणार नाही. सिध्दार्थनगर वाहनतळावर आम्ही ५० वर्षापासून व्यवसाय करतो, असे अध्यक्ष म्हस्के यांनी सांगितले.
आम्ही रेल्वे प्रशासनाला विनंती करुन रिक्षा येण्याच्या जाण्याच्या मार्गात भिंत उभारुन अडथळा करू नका. या जागेत वाहनतळ असल्याने कोणीही अतिक्रमण करणार नाही, असे स्थानिक रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांना रिक्षा चालकांनी सांगितले आहे. तरीही रेल्वे अधिकारी ऐकण्यास तयार नाहीत. रिक्षा चालकांचे न ऐकता रेल्वेने वाहनतळाच्या प्रवेशव्दारावर भिंत उभारणीचे काम रेटून सुरू केले तर त्यात अडथळा आणणे शक्य होणार नाही. रेल्वे प्रशासनाचे या महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी सिध्दार्थनगर वाहनतळावरील रिक्षा चालकांनी बुधवारी सकाळपासून प्रवासी वाहतूक बंद आंदोलन सुरू केेले आहे. हा वाहनतळ बंद केला तर प्रवाशांचे हाल होणार आहेत. प्रवाशांनीही या आंदोलनात उतरावे, असे आवाहन म्हस्के यांनी केले आहे. स्थानिक रेल्वे अधिकारी याविषयी बोलण्यास तयार नाहीत.
हेही वाचा >>>ठाणे: कामे निकृष्ट दर्जाची झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा
प्रवाशांना फेरफटका
सिध्दार्थनगर वाहनतळावरुन कल्याण पूर्वेतील आमराई, विजयनगर, तिसगाव, तिसगाव नाका, नांदिवली, आरटीओ, नमस्कार ढाबा भागात रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करतात. बुधवारी सकाळपासून सिध्दार्थनगर वाहनतळावरील रिक्षा बंद होताच प्रवाशांना फेरफटका घेऊन कोळसेवाडी रिक्षा वाहनतळावर जाऊन तेथून इच्छित स्थळी जावे लागले. ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या वळशाचा सर्वाधिक फटका बसला.
कोकण विभाग रिक्षा टॅक्सी प्रवासी महासंघाचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांना संपर्क साधला. सर्वच रिक्षा बंद नाहीत. काही रिक्षा सुरू आहेत, असे सांगितले.
“ कल्याण पूर्वेतील सिध्दार्थनगर वाहनतळावरुन दररोज शेकडो प्रवासी येजा करतात. ६०० रिक्षा चालकांना या वाहनतळावरुन रोजीरोटी मिळते. हा महत्वाचा वाहनतळ रेल्वे प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे बंद होत असेल तर त्याचा रिक्षा चालकांसह प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. या महत्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासठी रिक्षा चालकांनी बंद आंदोलन सुरू केला आहे ”-विशाल म्हसके, अध्यक्ष ,रिपब्लिकन रिक्षा टॅक्सी चालक संघटना ,कल्याण.