ठाणे : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका सुरु आहेत. ठाणे शहरातील प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करण्याचे स्वरुप हे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. मिरवणूकीत गर्दी दिसण्यासाठी काही उमेदवारांकडून दिवसाच्या मोबदल्यावर रिक्षा चालकांना बोलावून मिरवणूकीत सहभागी केले जात आहे. तर, काही उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनीक्षेपक तसेच उमेदवाराच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जात आहे. या प्रचार आणि मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदार संघात सकाळी मिरवणूक तर, संध्याकाळी सभा असे सध्या उमेदवारांचे वेळापत्रक ठरलेले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे दिसून येते. परंतू, इतक्या कमी वेळात प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. ठाणे शहरात ओवळा – माजिवडा, कोपरी -पाचपाखाडी, ठाणे शहर आणि कळवा- मुंब्रा असे विधानसभा मतदार संघ आहेत. शहरात या मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका, मेळावे आणि सभा आयोजित केल्या जात आहेत. या मिरवणूकांमध्ये गर्दी दिसावी तसेच मिरवणूकीत कार्यकर्त्यांना पायी चालण्यास त्रास होऊ नये यासाठी रिक्षा चालकांना सहभागी केले जात आहे. या रिक्षांना पक्षाचा झेंडा लावून या रिक्षा मिरवणूकीत फिरवल्या जातात. यासाठी रिक्षा चालकांना दररोजचा मोबदला दिला जात आहे.

प्रत्येक रिक्षा चालकाला ५०० ते १ हजार रुपये दिले जात असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. तर, काही उमेदवारांनी भाडेतत्त्वावर काही रिक्षा चालकांना घेतले असून त्यांच्या रिक्षाला स्वत:चे छायाचित्र आणि उमेदवाराचे नाव, पक्ष आणि उमेदवाराला भरघोस मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करणारे ध्वनीक्षेपक रिक्षामध्ये लावले आहेत. या रिक्षा उमेदवाराच्या मतदारसंघात फिरविल्या जात आहेत. यासाठी रिक्षा चालकाला दिवसाचे ३०० ते ५०० रुपये दिले जात आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून रिक्षा चालकांना दररोजच्या उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा… ठाणे रेल्वे स्थानकातील स्वच्छतागृहात लुबाडणूक

रिक्षा चालकाचे म्हणणे….

रिक्षाच्या माध्यमातून नेहमी दिवसाला १ हजार ते १५०० इतके उत्पन्न मिळते. हे उत्पन्न मिळविण्यासाठी प्रवासी वाहतून सकाळ ते संध्याकाळ करावी लागते. परंतू, गेले दहा ते पंधरा दिवसापासून सुरु असलेल्या निवडणूक प्रचारामुळे आमच्या दिवसाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असे शहरातील एका रिक्षा चालकाने सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw owners drivers have acche din in assembly election campaign asj