ठाणे : शहरातील मुख्य तसेच अंतर्गत मार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीत रिक्षा अडकून पडत असल्याने त्याचा फटका सायंकाळी कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांना बसू लागला आहे. आधीच कोंडीमुळे उशीराने रिक्षा उपलब्ध होत असतानाच, आता कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने अनेक चालक सायंकाळच्यावेळेत रिक्षा बंदच ठेवणे पसंत करीत आहेत. यामुळे सुमारे ५० टक्के रिक्षा प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत असून या रिक्षा टंचाईमुळे स्थानकाजवळील गावदेवी थांब्यांवर प्रवाशांच्या लांब रांगा लागत आहेत. रिक्षाची वाट पहात प्रवाशांना अर्धा ते पाऊण तास थांब्यांवर ताटकळत उभे रहावे लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत.
ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. येथील अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, महात्मा फुलेनगर, इंदीरानगर, जयभवानीनगर, सावरकनगर, लोकमान्यनगर, यशोधननगर या भागातील अनेक नागरिक दररोज ठाणे स्थानकापर्यंतचा प्रवास करतात. त्याचबरोबर शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागातूनही अनेक नागरिक ठाणे स्थानकापर्यंत प्रवास करतात. या सर्वच भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. ठाणे शहरात सार्वजनिक वाहतूकीसाठी टिएमटीच्या बसगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. परंतु पुरेशा बसगाड्या नसल्याने अनेकजण शेअर रिक्षाने प्रवास करतात.
ठाणे स्थानकातील गावदेवी तसेच तलावपाळी परिसरात वागळे इस्टेट, लोकमान्यनगर, शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर या भागात जाणाऱ्या शेअर रिक्षांचे थांबे आहेत. या थांब्यांवर गेल्या काही दिवसांपासून अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीने प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होत आहेत. तोपर्यंत प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे रहावे लागत आहे. गावदेवी येथून लोकमान्यनगरच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या शेअर रिक्षा महापालिका मुख्यालय, नितीन कंपनी, ज्ञानेश्वरनगर, कामगार नाका मार्गे वाहतूक करतात. गेल्या काही दिवसांपासून महापालिका मुख्यालय ते नितीन कंपनी आणि नितीन कंपनी ते ज्ञानेश्वर नगर या दोन्ही मार्गांवर वाहतूक कोंडी होत आहे. तसेच शिवाईनगर, वसंत विहार, पवारनगर, घोडबंदर भागात जाणाऱ्या मार्गांवरही वाहतूक कोंडी होत आहे.
हेही वाचा >>>> कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात लवकरच दहा विद्युत बस
या कोंडीत रिक्षा अडकून पडतात. त्यामुळे अर्धा ते पाऊण तासाने थांब्यांवर रिक्षा उपलब्ध होत आहेत. सकाळच्या वेळेत १७०० च्या आसपास शेअर रिक्षा शहराच्या विविध भागातून स्थानकाच्या दिशेने प्रवासी वाहतूक करतात. परंतु कोंडीमुळे इंधन आणि वेळ वाया जात असल्याने अनेक चालक सायंकाळच्यावेळेत रिक्षा बंदच ठेवणे पसंत करीत आहेत. यामुळे सायंकाळच्या वेळेत ५० टक्के म्हणजेच ८५० रिक्षा प्रवासी सुविधेसाठी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे थांब्यांवर प्रवाशांचा लांब रांगा लागत आहेत. आधीच दिवसभर कामाच्या तणावामुळे थकवा आलेला असतो आणि त्यात रिक्षांची वाट पाहात उभे रहावे लागत असल्याने हाल होतात, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.
ठाणे शहराच्या विविध भागातून स्थानकापर्यंत शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते. या रिक्षांची संख्या सुमारे १७०० च्या आसपास आहे. यातील सर्वाधिक म्हणजेच २०० रिक्षा लोकमान्यनगर आणि वैतीवाडी परिसरात वाहतूक करतात. किसननगर, कामगार नाका आणि अशर आयटी पार्क येथे प्रत्येक १२५ शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते. श्रीनगर आणि रोड नंबर २२ येथे प्रत्येकी शंभर तर, वर्तकनगर, शास्त्रीनगर, पवारनगर आणि घोडबंदर भागात प्रत्येकी शंभर शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते. कॅडबरी आणि यशोधननगर नाका येथे ८० शेअर रिक्षांची वाहतूक सुरू असते, अशी माहीती रिक्षा संघटनेकडून देण्यात आली.
शहरात गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या कोंडीत रिक्षा अडकून पडत असल्याने त्या उशीराने थांब्यांवर येत आहेत. तसेच गणेशोत्सवानिमित्त अनेक चालक गावी आणि इतर ठिकाणी गेले आहेत. त्यामुळेही रिक्षा नेहमीपेक्षा कमी रिक्षा रस्त्यावर येत आहेत. -विनायक सुर्वे अध्यक्ष, एकता रिक्षा टॅक्सी चालक मालक सेना
गणेशोत्सवानिमित्त सायंकाळच्यावेळी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे. रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने विविध मार्गावर कोंडी होत आहे. यामुळेच रिक्षा उपलब्ध होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. – डॅा. विनयकुमार राठोड पोलीस उपायुक्त, वाहतुक शाखा, ठाणे