डोंबिवली – बदलापूरमधून गेल्या महिन्यात चोरीला गेलेली रिक्षा डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे मिळाली आहे. चोरीच्या रिक्षेवरील चालक विना गणवेश डोंबिवली पूर्वेत रामनगर भागात रिक्षा चालवत होता. डोंबिवली वाहतूक विभागाच्या पोलिसांनी या रिक्षा चालकाकडे रिक्षेची कागदपत्रे मागताच तो गडबडला. या गडबडीतून गुरुवारी हा चोरीचा प्रकार उघडकीला आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजेंद्र अजिनाथ जाधव (४२) असे चोरट्याचे नाव आहे. तो काटई-बदलापूर रस्त्यावरील कोळेगाव येथे हनुमान मंदिर भागात राहतो. डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांच्या सूचनेवरून शहरात वाहन कोंडी होऊ नये म्हणून मुख्य वर्दळीचे रस्ते, चौक, डोंबिवली रेल्वे स्थानक भागात वाहतूक पोलीस, वाहतूक सेवक तैनात असतात. गुरुवारी वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनंत कदम, हवालदार शशिकांत गांगुर्डे, गणेश कोळी रामनगर भागात वाहतूक नियोजनाचे काम करत होते. यावेळी विना गणवेश असलेला एक रिक्षा चालक रिक्षा (एमएच ०५-सीजी-८६२३) वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक करत असल्याचे गस्तीवरील वाहतूक पोलिसांना दिसले.

हे ही वाचा…बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी

वाहतूक अधिकारी कदम, गांगुर्डे यांनी संबंधित रिक्षा चालकाला गणवेश का घातला नाही, असा प्रश्न करून त्याच्या रिक्षेची कागदपत्रे मागितली. चालक उडवाउडवीची उत्तरे देऊन तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. वाहतूक पोलिसांनी त्याला रोखले. त्याच्या रिक्षेच्या वाहन क्रमांकावरून ई चलन माध्यमातून मूळ रिक्षा मालकाचा शोध घेतला. प्रसाद गुरूनाथ माळी असे मूळ रिक्षा मालकाचे नाव असल्याचे आणि ते बदलापूर येथे राहत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी माळी यांना संपर्क केला. तुमची रिक्षा कोठे आहे अशी विचारणा केली. माळी यांनी गेल्या महिन्यात आपली रिक्षा बदलापूर येथून चोरीला गेली आहे, असे सांगितले. या संदर्भात आपण बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे, अशी पुष्टी जोडली.

त्यामुळे आपण रोखलेली रिक्षा ही चोरीची असल्याचे वाहतूक पोलिसांना समजले. वाहतूक पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने राजेंद्र जाधव असे नाव असल्याचे सांगितले. पोलिसांनी रिक्षेसह त्याला ताब्यात घेतले.डोंबिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश बने यांनी तात्काळ ही माहिती बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बलवाडकर यांना दिली. या प्रकरणातील तपास अधिकारी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील डोंबिवलीत आले. त्यांनी आरोपी जाधव याच्यासह चोरीची रिक्षा ताब्यात घेतली.

हे ही वाचा…डोंबिवलीत विकासकाकडून जुनाट झाडांची कत्तल; उद्यान विभागाला लेखी खुलाशातून कबुली

आरोपी राजेंद्र जाधव विरूध्द रामनगर पोलीस ठाण्यात एकूण चार चोरीचे गुन्हे दाखल आहेत. राजेंद्र जाधव याने आतापर्यंत किती रिक्षा किंवा इतर वाहने चोरली आहेत याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवलीत वाहन चोरीचे प्रमाण वाढल्याने वाहन मालक हैराण आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rickshaw stolen from badlapur last month recovered due to police vigilance of dombivli traffic department police sud 02