डोंबिवली पूर्व भागात तुकाराम नगर येथील एका मैदानातून एका रिक्षा चालकाची रिक्षा रात्रीच्या वेळेत चोरट्याने चोरुन नेली होती. रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे डोंबिवली जवळील सागर्ली गावातील एका चोरट्याला गुरुवारी अटक केली आहे.
हेही वाचा- ठाणे जिल्हा विकासाचा भविष्यवेधी आराखडा, खासदार श्रीकांत शिंदे यांची माहिती
डोंबिवली परिसरात होणाऱ्या भुरट्या चोऱ्यांमधील बहुतांशी आरोपी आता आजदे, सागर्ली भागातून अटक होत असल्याने हा भाग चोरांचा अड्डा बनत चालला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आतापर्यंत त्रिमूर्ती झोपडपट्टी भागातून चोरांना पोलिसांकडून अटक केले जात होते. आजदे, सागर्ली भागात बेकायदा चाळी अधिक संख्येने आहेत. या भागात स्वस्तात खोली मिळत असल्याने चोरांचे या भागाला प्राधान्य मिळत असल्याचे समजते.
डोंबिवली पूर्व भागातील तुकाराम नगर मधील रवी पाटील मैदानाच्या बाजुला या भागात राहत असलेल्या आनंद मिरजकर (६३) यांनी आपली रिक्षा दिवसभराचा प्रवासी वाहतुकीचा व्यवसाय करुन झाल्यावर रविवारी रात्री उभी करुन ठेवली होती. रात्रीच्या वेळेत चोरट्याने रिक्षा चोरुन नेली.
हेही वाचा- ‘मराठी शाळांमध्ये संस्कृतीची जपणूक’; अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचे प्रतिपादन
रिक्षाचालक मिरजकर यांचा उदरनिर्वाह रिक्षेवर अवलंबून असल्याने त्यांच्या समोर संकट उभे राहिले. मिरजकर यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचीन सांडभोर यांनी तात्काळ साहाय्यक पोलीस निरीक्षक योगशे सानप यांना तपासाचे आदेश दिले. पोलिसांनी रिक्षा उभी असलेल्या ठिकाणापासून ते परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यांना एक इसम रिक्षा चोरुन नेत असल्याचे दिसले. रिक्षा ज्या मार्गाने नेण्यात आली. त्या मार्गाचा माग काढत पोलीस डोंबिवली जीमखाना रस्त्यापर्यंत पोहचले. तेथे त्यांना रिक्षा सागर्ली गाव हद्दीत नेण्यात आल्याचे दिसले.
हेही वाचा-
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या इसमाची पोलिसांनी गुप्त मार्गाने माहिती काढली. तो महेश देवाडिगा (३५) असून सागर्ली गावात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो बेरोजगार असल्याचे पोलिसांना समजले. साहाय्यक पोलीस निरीक्षक सानप, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, दिलीप कोती, शिवाजी राठोड, नितीन सांगळे यांनी सागर्ली भागात सापळा लावला. तांत्रिक माहितीच्या आधारे त्याला रिक्षेसह ताब्यात घेतले. महेशने आतापर्यंत किती चोऱ्या केल्या आहेत. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.