डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील फत्ते अली रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करण्यासाठी सोमवारी हा रस्ता खोदण्यात आल्याने डोंबिवली पूर्व भागात रिक्षा कोंडीला सुरुवात झाली आहे. डोंबिवली पूर्व भागातील फत्ते अली रस्ता सर्वाधिक वाहन वर्दळीचा आहे. बाजारपेठेतील फडके रस्ता पोहचरस्त्याला हा रस्ता मिळतो. फत्ते अली रस्त्यावर अनेक वर्षापासून लालबावटा रिक्षा संघटनेचं रिक्षा वाहनतळ आहे. या रिक्षा तळावर दररोज १५० ते २०० रिक्षा प्रवासी वाहतूक करतात.
फत्ते अली रस्ता खोदल्याने या रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षा चालकांनी रस्ते काम पूर्ण होईपर्यंत केळकर रस्ता रिक्षा वाहनतळ, पाटकर रस्ता वाहनतळ, पी पी चेंबर्स मॉल समोर, बाजीप्रभू चौक इंदिरा चौक रिक्षा वाहन तळांवर उभ्या करून प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली आहे. अचानक १५० ते २०० रिक्षा इतर रिक्षा वाहन तळांवर येऊ लागल्याने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील रस्त्यांवर रिक्षा कोंडी दिसून येत आहे.
केळकर रस्त्यावर उभ्या करण्यात येणाऱ्या रिक्षांच्या रांगा थेट कोपर पूल, वाहतूक कार्यालयाच्या दिशेने गेल्या आहेत. त्यामुळे केळकर रस्त्यावरून एकेरी मार्गिकेतून वाहनांना जावे लागते. पी पी चेम्बर्स मॉल समोर रिक्षा वाहनतळ सुरू केल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आहे. या ठिकाणी रीजन्सी संकुलाकडे जाणारी खाजगी बस उभी असते. बसमध्ये प्रवासी चढेपर्यंत पाठीमागे वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. आता या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सुरू झाल्याने ही कोंडी येत्या काही दिवसात आणखीन वाढेल अशी भीती परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
मानपाडा रस्त्याने येणारी बहुतांशी वाहने फत्ते अली रस्त्याने फडके रस्ता ओलांडून नेहरू रस्त्याने ठाकुर्ली पुलावरून डोंबिवली पश्चिमेकडे जातात. फडके रोड कडून मानपाडा रस्त्याकडे जाणारी अनेक वाहने फत्ते अली रस्त्याने पुढे जातात. महत्त्वाचा रस्ता काँक्रिटीकरण कामासाठी बंद करण्यात आल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय झाली आहे.
फत्ते अली रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. हे अनेक वाहनचालकांना माहिती नाही. असे वाहन चालक रस्त्याच्या ठिकाणी येऊन माघारी वळून अन्य मार्गाने जात आहेत. ही वाहने वळवताना पी पी चेम्बर्स मॉल समोर वाहन कोंडी होत आहे.
गेल्या चार महिन्यापूर्वी फत्ते अली रस्त्याचे पालिकेने डांबरीकरण करून रस्ता सुस्थितीत केला होता. आता तोच रस्ता पुन्हा काँक्रीटीकरण कामासाठी खोदून पालिकेने करदात्या पैशांची उधळपट्टी केली आहे, अशी टीका डोंबिवलीतील रहिवाशांकडून केली जात आहे.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी डोंबिवली पूर्व भागातील इंदिरा चौक, बाजीप्रभू चौक केळकर रस्ता, पीपी चेंबर्स मॉल या ठिकाणी वाहतूक पोलीस आणि वाहतूक सेवकांची संख्या वाढवली आहे. पूर्व भागात रस्ते कामामुळे वाहन कोंडी होणार नाही याची खबरदारी घेण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक गीत्ते यांनी सांगितले.