ठाणे येथील इंदिरानगर भागातील रस्त्यावर रिक्षा उभी करण्यासाठी मागितलेला दोन हजारांचा मासिक हप्ता देण्यास नकार दिला म्हणून परिसरातील चार गुंडांनी नऊ रिक्षा तसेच एका कारच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरातील रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तिघांचा शोध घेत आहेत.
संजय जाधव, समीर महाशब्दे आणि विनोद नेपाळी, अशी आरोपींची नावे असून चौथ्या गुंडाचे नाव समजू शकलेले नाही. हे सर्व जण इंदिरानगर भागात राहतात. याच भागात रस्त्याच्या कडेला दररोज रात्री रिक्षा उभ्या करण्यात येतात. या रिक्षांचा आकडा मोठा असून त्या रिक्षांच्या देखरेखीसाठी सुरक्षारक्षकही नेमण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर चालक बेकायदेशीर रिक्षा पार्किंग करतात म्हणून या चौघांनी चालकांकडे दरमहा दोन हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, रिक्षाचालकांनी तो देण्यास नकार दिला. या रागातून चौघांनी सोमवारी पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या नऊ रिक्षा तसेच एका कारवर दगडफेक करत काचा फोडल्या. तसेच याप्रकरणी पोलिसात तक्रार केल्यास तर जिवे मारू, अशी धमकी सुरक्षारक्षकास दिली.
त्यानंतर हे चौघे तेथून निघून गेले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ठाणे शहरात वाहन तळांची पुरेशी सुविधा नसल्याने अनेक जण रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे पार्किंगच्या जागेवरून हाणामारीचे प्रकार शहरात घडत असतानाच आता गल्लीबोळातील गुंडही बेकायदा पार्किंगच्या नावाखाली हप्ते मागत असल्याचे या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा