वर्षभरात ५०२ गुन्हे; १ कोटी ३४ लाखांचा दंड वसूल
वसई तालुक्यात वीजचोरीचे प्रमाण वाढले असून २०१८ या वर्षांत वीजचोरीचे ५०२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्य़ांच्या कारवाईतून १ कोटी ३४ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. वाढत्या वीजचोरीमुळे आर्थिक फटका बसत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.
एकीकडे वाढीव वीज देयकांमुळे वीजग्राहक मेटाकुटीला आले असतानाच दुसरीकडे सर्रास वीजचोरी केली जात असून त्यांच्यावर कारवाईचे प्रमाण कमी आहे. वाढत्या वीजचोरीचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होत आहे. वसई तालुक्यात वीज वितरण कंपनीचे आठ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. मात्र त्या व्यतिरिक्त छुप्या मार्गाने वीजचोरी केली जात आहे. त्यामुळे त्याचा फटका या वीज ग्राहकांना बसू लागला आहे. विजेच्या खांबावर आणि विद्युतवाहिनीवर आकडे टाकून आणि मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी केली जाते, तर काही ठिकाणी बेकायदा बांधण्यात आलेल्या चाळी आणि घरांना बेकायदा वीजजोडणी देण्यात आली आहे. त्याची महावितरण कंपनीच्या दप्तरी नोंद नसल्याचे समोर आले आहे. वर्षभरात वीजचोरीचे ५०२ प्रकार उघडकीस आले आहे. वीजचोरांना लगाम घालण्यास महावितरणला अपयश आले आहे. एकीकडे कोटय़वधींची थकबाकी आहे, तर दुसरीकडे वीजचोरीचे प्रमाण वाढत आहे. अशा दुहेरी संकटात महावितरण सापडले आहे.
वीजचोरी करणाऱ्यांवर महावितरण विभागामार्फत कारवाई केली जाते, तसेच वीजचोरीचे प्रकार थांबवण्यासाठी प्रत्येक विभागाला सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडूनही तपासणी सुरू आहे. जर वीजचोरी करताना आढळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून दंड वसूल केला जातो.
– दिनेश अग्रवाल, मुख्य अभियंता, महावितरण विभाग, वसई