ठाणे – वाड्या, वस्त्यांमधील तीव्र पाणी टंचाई शहापूर तालुक्याला काही नवी नाही. मुंबई, ठाण्याला पाणी पुरवठा करणारे हे धरणांचे गाव गेली अनेक दशके पुरेशा पाण्याअभावी टंचाईग्रस्त आहे. ही टंचाई सोडविण्याच्या बाता शासन स्तरावर अनेकदा मारल्या गेल्या. प्रत्यक्षात जानेवारी महिना उजाडताच येथील गावकऱ्यांच्या पोटात पाण्याअभावी गोळा येऊ लागतो. यंदा तर या पाणी टंचाईची दाहकता तीव्र झाली आहे. पाण्याच्या शोधात मैलन मैल चालत जाऊनही रिकाम्या हंड्यासह परतणाऱ्या येथील महिला कडे – कपाऱ्यातून एकत्र केलेले गाळयुक्त पाण्याचा शोध घेताना जागोजागी दिसू लागल्या आहेत. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत टॅकरच्या रांगाही यंदा वाढल्या आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

कड्या-कपाऱ्यांमधून वाहणाऱ्या पाण्याचा शोधासाठी पहाटेच्या प्रहरी बाहेर पडणाऱ्या महिला आणि मुलांची तांब्याभर पाण्यासाठी सुरु असणारी ही पायपीट गेल्या दशकभरातील मोठया दुष्काळाचे संकेत देऊ लागली आहे.गावातील नैसर्गिक स्त्रोत आटले, घरामध्ये नळ आहेत मात्र जलवाहिन्याच नाहीत, त्यामुळे पाणीही नाही असे चित्र शहापूरातील वाड्या, वस्त्यांना नवे नाही. डिसेंबरच्या अखेरीसच येथे पाणी टंचाईची चाहूल लागते. नद्या, नाले आटू लागतात, गावातील विहीरींचे पाणी खोल जाते आणि पाण्यासाठी वणवण सुरुही होते. गेल्या काही वर्षापासून मात्र जानेवारी महिन्याच्या मध्यापासूनच येथील ग्रामस्थांची आणि विशेषत: आदिवासी पाड्यांमधील भूमीपुत्रांची पाणी शोध मोहीम सुरु होत असल्याचा अनुभव या भागात नियमीत कार्यरत असलेले सामाजिक कार्यकर्ते सागतात. दरवर्षी जिल्हा प्रशासन शहापूर तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी काही कोटी रुपयांचा आरखडा तयार करते. या ऐवजी तालुक्याच्या शाश्वत पाणी पुरवठाबाबत राबविण्यात येत असलेल्या योजनांना पूर्णत्वास नेण्यासाठी कष्ट होताना दिसत नाहीत. त्यामुळे पाणी टंचाई तर असणारच परंतु गेल्या काही वर्षात कडकडीत दुष्काळ भासावा असे चित्र या भागात दिसू लागल्याचे मत येथील जुने जाणते व्यक्त करु लागले आहेत.

टँकर दुप्पट

यंदा फेब्रुवारीच्या अखेरीसच तापमानात तीव्र वाढ झाल्याने उन्हाच्या झळांनी सर्वांना त्रस्त केले आहे. या वाढत्या उन्हामुळे नैसर्गिक स्त्रोतातले थोडेफार शिल्लक असलेले पाणी देखील आटण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात १२ टँकरद्वारे शहापुर तालुक्यात पाणी उपलब्ध करून दिले जात होते. ही संख्या आता दुप्पटीने वाढली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ सुत्राने लोकसत्ताला दिली. सध्या शहापूर तालुक्यातील ८२ पाड्यांवर ३० टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यंदाचा एप्रिल आणि मे महिना अधिक उष्ण असल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने येत्या काळात ही संख्या आणखी वाढू शकेल आणि त्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे सांगितले जात आहे.

पुढच्या पिढीने देखील तेच पाहायचे का ?

दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी कायम वणवण करावी लागते. अनेक मैल चालत जाऊन दुसरे पाडे अथवा गाव येथील विहिरींमध्ये शिल्लक असलेल्या पाण्यासाठी धावाधाव करावी लागते. आमची अनेक वर्ष पाण्याच्या याच धावपळीत गेली. आमच्या पुढच्या पिढ्यांनी देखील हेच पाहायचे का, असा संतप्त शहापूर तालुक्यातील फुगाणे ग्रामपंचायत हद्दीतील अघाणवाडी या पाड्यातील ठकीबाई वाघ या महिलेने व्यक्त केला. टॅकर येतात, तात्पुरती तहान भागवली जात असल्याचे चित्रही उभे केले जाते. परंतु यंदाचा उन्हाळा साधासुधा नाही. पाणी खोलवर जाऊनही मिळत नाही. कड्या, कपाऱ्यांवरील पाणी हा आमचा सहारा असायचा. यंदा तर कड्या, कपाऱ्यातून गळणारे पाणीही तांब्यात येत नाही असे निळू बुरखे या स्थानिकाने सांगितले.

जल जीवनचे जल कधी ?

गेले तीन वर्षांहून अधिक काळ या ठिकाणी जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. काही ठिकाणी केवळ नळ जोडणी करून ठेवल्या आहेत मात्र त्यासाठी जलवाहिनीच नाही. काही ठिकाणी दोन्ही आहेत मात्र त्यात पाणी कुठून सोडायचे याचे नियोजन नाही असा सगळा गोंधळ आणि संतप्त कारभार जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद यांचा असल्याने ग्रामस्थांनी जल जीवनची आशा सोडून दिली असल्याची माहिती या ठिकाणी सामाजिक काम करणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते व्यक्त करतात. गेल्या काही वर्षात उन्हाची दाहकता वाढत आहे. पाण्याचे स्त्रोत लवकर आटतात. त्या तुलनेत जिल्हा प्रशासन आक्रमक योजना राबवित नाही, अशी टिका श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते प्रकाश खोडका यांनी केली. स्थानिक प्रशसानाकडे हंडे मोर्चेही झाले. परंतु तात्पुरती सोयीच्या पलिकडे कुणीही पहायला तयार नाही, असेही ते म्हणाले.