बदलापूर : बदलापूर आणि परिसरात सुरू विजेच्या लपंडावाचा बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या तसेच अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना, शेतघरांना आणि रोपवाटिका शेतकऱ्यांनाही फटका बसतो आहे. प्रायोगिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देण्याचे चक्र बिघडते आहे. वाढत्या तापमानात पाण्याचा माराही अधिक करावा लागत असताना विजेअभावी हे पाणी देताना रोपवाटिका शेतकऱ्यांची तारांबळ उडते आहे. त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन बिघडू लागले आहे.

गेल्या काही वर्षात बदलापूर आणि अंबरनाथ तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिकरण झाले. त्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या पायाभूत सुविधा मात्र तितक्याच राहिल्या. याचा सर्वाधिक परिणाम महावितरणाच्या वीज वितरण सेवेवर झाल्याचे दिसून येते. दरवर्षी अंबरनाथ, बदलापुरात मार्च ते मे दरम्यान तापमानात वाढ झाल्यास विजेची मागणी वाढते. या काळात अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत होतो. परिणामी वीज भाराचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे काही भागांना काही तास विजेविना काढावे लागतात. याबाबत महावितरण जाहिरपणे सांगत नसले तरी त्याचा ग्राहकांना थेट फटका बसतो आहे. त्यातच मंगळवारपासून अंबरनाथच्या आनंदनगर वाहिनीवर रोहित्र क्षमता वाढीच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामामुळे आनंदनगर वाहिनीवरील बदलापूर पूर्वेतील काही भागांना फटका बसतो आहे. मात्र विजेचा लपंडाव नित्याचा असल्याचा आरोप बदलापुरातील उद्योजकांच्या बिवा संघटेनेने केला आहे. यामुळे उत्पादनात घट होत असल्याची ओरड होत असताना आता शेतकरीही महावितरणाच्या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत. अंबरनाथ तालुक्यात बदलापूर शहराच्या वेशीवर अनेक शेतकरी आजही शेती करतात. अनेक प्रयोगशील शेतकरी विविध पिके घेत असतात. याच भागात शेतघरे, रोपवाटिकाही विकसीत करण्यात आल्या आहेत. या सर्वांना विजेच्या लपंडावाचा फटका बसतो आहे.

पाण्याची चक्र बिघडले

विजेच्या लपंडावाचा फटका सातत्याने बसतो. यामुळे पाणी देण्याचे चक्र बदलले आहे. पाण्याचे चक्र बदलल्याने पिकांवर परिणाम होण्याची भीती कृषीभूषण राजेंद्र भट यांनी व्यक्त केली आहे. सध्या तापमान वाढत असल्याने पाणीही अधिक द्यावे लागते आहे, असेही भट लोकसत्ताशी बोलताना म्हणाले.

रोपवाटिका शेतकऱ्यांना फटका

रोपवाटिकांमध्ये कमी वयाची रोप असतात. त्यांना वेळोवेळी पाणी देण्याची गरज असते. वाढत्या तापमानात पाणी देण्याची वारंवारताही वाढते. अशावेळी वीज नसल्याने पाणी देण्यात अडचणी येतात. काही शेतकऱ्यांनी पाण्याच्या टाक्या बसवण्यास सुरूवात केली आहे. मात्र विजेचा अखंडीत पुरवठा होणे आवश्यक आहे, अशी भावना रोपवाटिकाधारक शेतकरी व्यक्त करत आहेत. तर या भागात अनेक शेतघरेही असून त्यात आता पर्यटक मोठ्या संख्येने येतात. पण विजेअभावी दुपारच्यावेळी पर्यंटकांना आणि परिणामी शेतघर मालकांनाही त्याचा फटका बसतो आहे.