बदलापूरः गेल्या काही दिवसांपासून तापमानात झालेली वाढ आणि त्याचवेळी वाढलेला दमटपणा यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिक घामाघूम झाले आहेत. तापमानात वाढ झाल्याने उष्णताही वाढली असून गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत जिल्ह्यातील तापमान दोन अंशांनी खाली आले असले तरी दमटपणामुळे उन्हाच्या झळा बसत आहेत. सायंकाळच्या वेळीही दमटपणा तसाच असल्याने उष्णतेच्या झळा सहन कराव्या लागतात.
हेही वाचा >>> कल्याण : पतीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून स्थापत्य अभियंता महिलेची आत्महत्या
यंदाच्या वर्षात वातावरणात विविध बदल पहायला मिळत आहेत. मार्च महिन्यातच यंदाच्या वर्षात पारा चाळीशीपार गेला होता. त्यामुळे उन्हाळ्याला लवकर सुरूवात झाल्याचा अनुभव येत होता. मार्च आणि एप्रिल महिन्यात पावसाच्या हजेरीने वातावरणात बदल झाला होता. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून तापमानात वाढ दिसून आली होती. मधल्या काळात वातावरणात तापमानात घट पाहायला मिळाली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा तापमानात वाढ दिसून आली. गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यातील तापमान चाळीशीपार गेल्याचे दिसून आले होते. त्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात दमटपणा वाढल्याने उन्हाच्या झळा बसत होत्या. जिल्हाचे सरासरी तापमान चाळीस असताना दमटपणामुळे ४४ ते ४५ अंश सेल्सियस तापमानाचा अनुभव येत होता.
हेही वाचा >>> डोंबिवलीत बेकायदा बांधकामांवर कारवाई
गुरूवारी तापमान चाळीशीपार गेल्यानंतर शुक्रवारी तापमानात दोन अंश सेल्सियसची घट झाल्याचे दिसून आले. शुक्रवारी जिल्ह्यात मुरबाड जिल्ह्यात सर्वाधिक तापमान मुरबाड तालुक्यात नोंदवण्यात आले. मुरबाडमध्ये ४२.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद खासगी हवामान अभ्यासकांनी केली आहे. त्याखालोखाल शेजारच्या कर्जतमध्ये ४२, बदलापूरमध्ये ३९.४, उल्हासनगरमध्ये ३९, कल्याण ३८.८, डोंबिवली ३८.२, ठाणे, ३७.२ आणि नवी मुंबई येथे ३७ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली, अशी माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.
चौकटः मार्च महिन्यात ४० अंश सेल्सियस तापमानात आर्दता हे १० ते २० टक्क्याच्या आसपास असते. त्यामुळे कोरडा उन्हाळ्यामुळे घाम येत नाही. पण आता मे महिन्यात ३८ ते ४० अंश सेल्सियसमध्ये आर्द्रता ही ३० ते ४० टक्के असते. त्यामुळे तापमान आभास हा ४५-४६ अंश सेल्सियसवर पोहोचतो. म्हणून घाम येऊन चीक चीक वाटते, असे खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे. तसेच पूर्व मॉन्सूनचा महिना असल्याने कोकणात अरबी समुद्रा वर खारे वारे सक्रीय होतात. त्यामुळे दुपार होऊन संध्याकाळी आणि रात्री अधिक चिकट वातावरण होते. अधिक तापमान आणि दमटपणा मिश्रण कारणीभूत याला कारणीभूत ठरते, असेही मोडक म्हणाले.