ठाणे : गेल्या काही आठवड्यांपासून सातत्याने वाढत असलेले भाजीपाल्याचे दर आता घरगुती खानावळ चालविणाऱ्या महिलांची चांगलीच डोकेदुखी ठरू लागली आहे. वाढलेल्या भाज्यांच्या दरामुळे घरगुती खानावळ चालविणाऱ्या महिलांना अधिकचे पैसे खर्च करून भाज्यांची खरेदी करावी लागत आहे. मात्र दैनंदिन ग्राहक तुटण्याच्या भीतीने जेवणाच्या दरात वाढ करता येत नसल्याने घरगुती खानावळ चालविणाऱ्यांची दुहेरी कोंडी होऊ लागली आहे. तर काही महिलांनी नाईलाजाने जेवणाचे दर वाढविले असल्याची माहिती लोकसत्ताशी बोलताना दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे, कल्याण, डोंबिवली तसेच प्रामुख्याने अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांमध्ये घरगुती खानावळ आणि पोळी भाजी केंद्रांचे विस्तृत असे जाळे आहे. कमी किमतीत पौष्टीक आणि चविष्ट आहार मिळणारी ठिकाणे म्हणून या खानावळी आणि पोळी भाजी केंद्र ओळखली जातात. या खानावळी आणि पोळीभाजी केंद्रांवर अवलंबून असलेला एक मोठा कामगार आणि विद्यार्थी वर्ग आहे. याच बरोबर इतर जिल्ह्यातील शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी या शहरांमध्ये स्थलांतरीत झालेला तरुण वर्ग हा महिलांकडून चालविल्या जाणाऱ्या घरगुती खाणावळींवर अवलंबून असतो. यामुळे जिल्ह्यात या पोळी भाजी केंद्राची संख्या देखील मोठी आहे. तर व्यावसायिक गाळ्यांमध्ये चालविणाऱ्या जाणाऱ्या या खानावळीची ग्राहक संख्या मोठी असल्याने या दरवाढीचा फटका त्यांना काही अंशी बसत नाही. मात्र लहान पोळी भाजी केंद्र चालविणाऱ्या महिलांना त्याचा थेट फटका बसतो कारण त्यांची ग्राहक संख्या ही मर्यादित असते. असेच काहीसे चित्र आता जिल्ह्यातील खाणावळ आणि पोळी भाजी केंद्र चालविणाऱ्या महिलांमध्ये दिसून येत आहे.

हेही वाचा…तिसऱ्या चौथ्या मार्गिकेतील महत्वाच्या टप्प्याला गती, मार्गिकेतील लहान मोठ्या पुलांच्या उभारणीसाठी निविदा जाहीर

भाज्या महाग यामुळे डबे महाग

पोळी भाजी केंद्र आणि खानावळ चालविणाऱ्या महिलांची मुख्य आर्थिक आवक ही नियमित दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या डब्ब्यांवर अवलंबून असते. यामध्ये कामगार वर्ग आणि विद्यार्थी यांचा प्रामुख्याने समावेश असतो. यामध्ये तीन ते चार चपाती, एक भाजी, डाळ – भात असे जेवण नियमित देण्यात येते. याचा दर हा १०० ते ११० रुपये इतका घेण्यात येतो तर फक्त भाजी आणि चपाती दिल्यास ७० ते ८० रुपये इतका दर आकारण्यात येतो. गेल्या काही दिवसांपासून काही महिलांनी याध्ये वाढ करून १३० ते १४० इतका केला आहे. भाज्यांच्या किमती सातत्याने वाढत आहेत तर दुसरीकडे व्यावसायिक सिलिंडरच्या दरात तब्बल २०० रुपयांनी वाढ झाली आहे. हा सगळा खर्च निघणार कसा. काही महिन्यांपूर्वी १०० रुपयात डबा देणे परवडत होते मात्र आता या दरात देणे अशक्य आहे. तर जेवणाचे प्रमाण कमी करणे योग्य नाही यामुळे कोणाचेही पोट भरणार नाही. त्यामुळे नाईलाजाने दर वाढवावे लागत असल्याचे प्रतिक्रिया घरगुती खानावळ चालविणाऱ्या मयुरी अमृतकर यांनी दिली आहे. तर चपाती आणि भाकरीच्या दरातही प्रत्येकी पाच ते सहा रुपयांची वाढ झाल्याची माहिती ठाण्यातील एक खानावळ चालविणाऱ्या महिलांनी दिली आहे.

हेही वाचा…ठाणे पुर्व सॅटीस पुल मार्गिका जोडणीचे काम लवकरच, मार्गिका जोडणीसाठी रेल्वे घेणार दोन तासांचे १९ ब्लाॅक

प्रतिक्रिया

नवीन वर्षाप्रमाणे दरवर्षी एप्रिल महिन्यात भाजी, भाकरी आणि चपातीचे दर वाढवले जातात. बाजारात काही ठिकाणी भाज्या महाग झाल्याने दर वाढले आहेत. मात्र नेहमीच्या ग्राहक जोडून ठेवण्यासाठी अजून पर्यंत दर वाढवले नाहीत. त्याच प्रमाणे ग्राहकांना यावर्षीचे सुरू असलेले बाजार भाव माहित असल्याने अचानक भाव वाढ करता येत नाही. प्रिया पार्टे, खानावळ चालक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rising vegetable prices becoming major issue for women running home based restaurants sud 02