तळवली गावाजवळील नदीपात्रात संवर्धन मोहिमेची सुरुवात

वर्तमानातील टंचाई आणि भविष्यातील गरज या दोन्ही समस्यांवर मात करण्यासाठी मोठय़ा धरणांऐवजी ‘थेंबे थेंबे तळे साचे’ ही पर्यायी जलनीतीच उपयुक्त ठरणार असून आता शासनानेही अप्रत्यक्षरीत्या हेच धोरण अवलंबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ठाणे जिल्ह्य़ातील कनकवीरा नदीपात्राचे संवर्धन करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाने हा कामाची घोषणा केली आणि गेल्या आठवडय़ापासून प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर आणि मुरबाड हे दोन तालुके नद्या आणि जलप्रवाहांच्या बाबतीत अतिशय श्रीमंत आहेत. संपूर्ण मुंबई तसेच ठाणे जिल्ह्य़ातील शहरी भागांना येथील धरणांपासून सध्या पाणीपुरवठा होतो. याच भागात काळू आणि शाई हे आणखी दोन मोठे धरण प्रकल्प शासनाने हाती घेतले आहेत. मात्र त्यासाठी हजारो लोकांचे विस्थापन, कोटय़वधी रुपयांचा खर्च आणि हजारो हेक्टर जंगलसंपदेचा ऱ्हास इतकी मोठी किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी तसेच पर्यावरणप्रेमींचा त्यास विरोध आहे. परिणामी गेले तप या दोन्ही प्रकल्पांच्या कामात इंचभरही प्रगती होऊ शकलेली नाही. त्यापासून धडा घेत आता उशिराने का होईना, पण शासनाने अन्य पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. कनकवीरा नदीचे संवर्धन हा त्याच प्रयत्नांचा एक भाग आहे. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या संदर्भात परिसरातील कॉर्पोरेट कंपन्या तसेच स्वयंसेवी संस्थांना याकामी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून पहिल्या टप्प्याचे काम सुरूही झाले आहे.

सह्य़ाद्रीच्या डोंगररागांमध्ये सिद्धगडाजवळ उगम पावणारी कनकवीरा नदी माळशेज घाटाच्या पायथ्याशी काळू नदीला मिळते. पावसाळ्यानंतर साधारण जानेवारीपर्यंत नदीप्रवाह वाहता असतो. त्यामुळे काठावरच्या गावांमधील शेतकरी काही प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. सध्या नदीपात्रात ठिकठिकाणी गाळ साचला आहे. संवर्धन मोहिमेत हे अडथळे दूर करण्यात येणार आहेत. जिल्हा प्रशासनाने केलेल्या आवाहनानुसार टेक्नोक्रॅट कंपनी आणि वसुंधरा संजीवनी मंडळ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मुरबाडपासून २८ किमीअंतरावरील तळवली गावाजवळ कनकवीरा नदीपात्रात संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी पोकलेन, जेसीबी आदी यंत्रांच्या साहाय्याने नदीतील गाळ काढला जात आहे.

तलावही जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

कल्याण-नगर महामार्गालगत तळवली गावाच्या हद्दीत तब्बल १२ एकरचा तलाव आहे. वर्षांनुवर्षे दुर्लक्ष केल्यामुळे त्यात मोठय़ा प्रमाणात गाळ साचला आहे. तो गाळ काढून तलावाचे खोलीकरण केले तर इथेही कोटय़वधी लिटर्स पाणी साचू शकेल. त्यामुळे कनकवीरा नदीप्रमाणेच या तलावाचाही जीर्णोद्धार व्हावा, अशी अपेक्षा तळवलीतील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

तळवली गावाजवळील दोन किलोमीटर नदीपात्रात ही कामे सुरू आहेत. पात्राचे रुंदीकरण आणि खोलीकरण करणे, गाळ काढणे, वृक्षारोपण करणे तसेच एक काँक्रीटचा बंधारा बांधणे या कामांचा त्यात समावेश आहे. त्यासाठी टेक्नोक्रॅट कंपनीने त्यांच्या ‘सीएसआर’ योजनेतून तब्बल ४५ लाख रुपये उपलब्ध करून दिले आहेत. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने हे काम सुरू असून येत्या १५ दिवसांत ते पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.

आनंद भागवत, निमंत्रक, वसुंधरा संजीवनी मंडळ, मुरबाड.

Story img Loader