भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गाई-गुरे, नदीकाठावरील भाजी-फळांचे मळे संकटात

मुरबाड, शहापूर, कल्याण ग्रामीण भागातून पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची पात्र कोरडी पडली असून या भागांतील खोल डोहही आटत चालले आहेत. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत गाई-गुरांना पाणी कसे मिळणार आणि नदीकिनारी लावलेला भाजीपाला कसा टिकणार, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. मार्चमध्येच हे चित्र निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

मुरबाड तालुक्यातून काळू, शाई, शिवळी, शहापूरमधून भडांगी, चोरनळी आणि कल्याणमधून वालधुनी, गंधारी या नद्या वाहतात. त्या पुढे उल्हास, भातसा नद्यांना मिळतात. ऑक्टोबरमध्ये भातशेतीचा हंगाम संपला की, या नद्यांमधील पाणीसाठय़ाच्या जोरावर शेतकरी भेंडी, कारली, घोसाळी, दुधी भोपळा, टोमॅटो, कलिंगडाची लागवड करतात. हा हंगाम मे अखेपर्यंत चालतो.

गतवर्षी पावसाने सप्टेंबरमध्येच दडी मारली. त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठा, नद्यांमधील पाण्याच्या उपलब्धतेवर झाला आहे. ऑक्टोबर अखेपर्यंत पाऊस सुरू राहिल्यास नद्यांमधील पाणीसाठा मार्च, एप्रिलपर्यंत पुरतो. शेती, गाई-गुरांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळते. यंदा पावसाने सप्टेंबरमध्येच दडी मारल्याने नदीतील पाणीसाठय़ावर परिणाम झाला आहे. जानेवारीपासून नदीतील वाहते पाणी बंद झाले आहे. नदीपात्रातील डोहांत पाणी साठून राहते. मात्र, वाढत्या उष्णतेमुळे होणारे बाष्पिभवन आणि शेतक ऱ्यांकडून होणाऱ्या पाणीवापरामुळे या डोहांतील पाणीही आटत चालले आहेत, असे मुरबाड तालुक्यातील आस्कोत येथील शेतकरी तात्या गंभीरराव यांनी सांगितले.

या नद्यांवर धरणे नसल्याने पावसाचे चार महिने पावसाचे आणि डोंगरातील झऱ्यांमधून निघणारे पाणी नद्यांना मिळते. सह्याद्रीतील सर्व नद्या पश्चिमवाहिनी आहेत. त्यांच्या पाण्यावर भाजीपाला पिके घेऊन शेकडो शेतकरी दर वर्षी लाखो रुपयांची उलाढाल करतात. नद्यांमधील पाणीसाठा जानेवारीपासून आटू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. नदीत मुबलक पाणी असेल तर शेतकरी कावडीने पाणी वाहून नेतो आणि भाजीचे मळे फुलवतो. पाणी खेचणारे पंप बसवून प्लॅस्टिकच्या वाहिन्या टाकून पाणी वाहून न्यावे लागते. पुरेशा दाबाने पाणी उचलले जात नसल्याने विजेवरील खर्च आणि परिणामी उत्पादन खर्च वाढतो, असे सायले गावच्या शेतकऱ्याने सांगितले.

नदीकिनारी फळबागायत करणारा शहरी जमीनदारही पाणी नसल्याने हैराण झाला आहे. कूपनलिकांतून फळ बागायतीला पाणी पुरवणे शक्य नसते. त्यात नदीचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावते, असे शेतघर मालकांनी सांगितले.

नद्यांमध्ये कोरडय़ा

पावसाळ्यात संगमजवळील काळू नदीपात्रात पूर परिस्थितीच्या वेळी पाणी पातळी २५ ते ३० फूट असते. वाहत्या पाण्याने विक्राळ रूप धारण केलेले असते. मात्र, सध्या या नदीच्या पात्रातील पाणी कमी झाल्याने अजस्र खडक, पाण्याच्या माऱ्याने तयार झालेल्या गुहा उघडय़ा पडल्या आहेत. इतर नद्यांचीदेखील हीच स्थिती आहे.

मेंढपाळांची आबाळ

दर वर्षी अहमदनगर, सोलापूर, सातारा, परभणी, औरंगाबादहून अनेक मेंढपाळ हजारो मेंढय़ा घेऊन कोकणात येतात. ऑक्टोबर ते जून अखेपर्यंत राहतात. यंदा पाणीसाठय़ाचा अंदाज घेऊन मुक्काम हलावावा लागत आहे, असे मुरबाड परिसरातील किरोबा शेपाळ या धनगराने सांगितले. या धनगराकडे १०० मेंढय़ांचे तीन कळप आहेत.

मुरबाड तालुक्यातील संगम येथील काळू नदीचे पात्र पाण्याअभावी कोरडे आणि उघडे पडले आहे.