मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासींची दळणवळणाची समस्या सुटली
मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या कोपऱ्याच्या वाडीला साकवचा आधार मिळाल्याने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या दळणवळणाच्या समस्येतून स्थानिकांची सुटका झाली आहे. कल्याण शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर असलेल्या मलंगगडाच्या कुशीत अनेक आदिवासी पाडे आहेत. मात्र शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या या पाडय़ांचा हवा तसा विकास अद्याप झालेला नाही. मलंगगड पट्टय़ातील कोपऱ्याची वाडीमधील आदिवासींना वाडीत जाण्यासाठी मोठा ओढा ओलांडून जावे लागते. पावसाळ्यात या ओढय़ाला पाणी आल्यानंतर वाडीचा गावाशी संबंध तुटत असे. यामुळे अनेक नागरिक आणि गुरांना जीव गमवावा लागला होता. याविषयी ‘लोकसत्ता ठाणे’मधील ‘वेशीवरचे गावपाडे’ या सदरात आदिवासी बांधव मूलभूत सोयीसुविधांपासून वंचित असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या ओढय़ावर साकव बांधून दिला आहे.
कोपऱ्याच्या वाडीत जायचे असेल तर बालनवाडीपासून एक किलोमीटर अंतराचा कच्चा रस्ता चालत ओढा पार करत वाडीत जावे लागत होते. या परिसरात पाऊस जास्त प्रमाणात पडत असल्याने पावसाळ्यात या ओढय़ांमधील पाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे या वाडीचा संपर्क खूप तुटत असे. या वाडीमध्ये अंगणवाडी ते तिसरीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. तिसरीपुढचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वाडीच्या बाहेर जावे लागते. पावसाळ्यात ओढय़ाला पाणी आले तर तिसरीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळा बुडते. त्यांना ओढा पार करून जाता येत नाही. तसेच या ओढय़ाच्या पाण्यामुळे काही नागरिकांचे तसेच जनावरांचे जीवही गेले आहेत. वाडीमध्ये सौरदिवे, शौचालय, शाळा, घरे आदी सोयीसुविधा आल्या. मात्र ओढय़ावर पूल नसल्याने पावसाळ्यात मात्र अनेकांना समस्यांना तोंड द्यावे लागत होते.
संथगतीने..पण विकासाच्या वाटेवर
कल्याण शहरापासून पंधरा-वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या मलंगगडाच्या कुशीत बालनवाडी, वाडीगाव, शिवमंदिर, कोपऱ्याची वाडी असे अनेक आदिवासी पाडे आहेत. बालनवाडी पार केल्यानंतर कोपऱ्याच्या वाडीमध्ये जाता येते. डोंगराच्या एका कोपऱ्यात ही वाडी वसली असल्याने कोपऱ्याची वाडी असे नाव पडले. कोपऱ्याच्या वाडीमध्ये ३० ते ४० घरे असून १५० नागरिक या वाडीत वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात वीज आली असून रस्त्यांचे कामही सुरू आहे. कुडाची घरे जाऊन पक्क्य़ा विटांची घरे गावकऱ्यांनी बांधली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी वाडीत एक कूपनलिका आहे. इतर कामासाठी वाडीत एक विहीर असून त्याचे पाणी वापरले जाते.
आदिवासी पाडय़ात विकासकामे होत असून यामुळे आता आदिवासी बांधवही मुख्य प्रवाहात येण्यास मदत होईल. तसेच पाण्याची टाकी बसवून त्यात सौरऊर्जेद्वारे पाणी चढविण्यात येऊ लागले आहे. शिवमंदिर आदिवासी पाडय़ामध्येही एका ओढय़ावर साकवची गरज असून खासदारांना याविषयी कळविले असून पाडय़ात खासदार निधी व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे होत आहेत.
-जितेंद्र पाटील, उपसरपंच.