ठाणे : गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जोरदार हाचाली सुरू केल्या असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात वाहनतळाची पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. यामुळे नागरिक रस्त्यावर बेकायदा वाहने उभी करतात. अशा वाहन पार्किंगमुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊ नये आणि नागरिकांना वाहनतळाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पालिका प्रशासनाने काही वर्षांपुर्वी पार्किंग धोरण आखले होते. त्याचा सविस्तर आराखडा तयार केला होता. या आराखड्यानुसार शहरातील रस्त्यांलगत पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी शुल्क आकारण्यात येणार होते. यातून पालिकेने उत्पन्न मिळणार होते.

यासाठी पालिकेने शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पार्किंग क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. यानुसार शहरातील १६८ रस्त्यांवर ११ हजार ९३१ वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध होणार होती. त्यामध्ये ६४७७ दुचाकी, १५४६ तीनचाकी, ३३६० हलकी चारचाकी, ५४८ अवजड चारचाकी वाहनांचा समावेश होता. या पार्किंगसाठी अ, ब, क, ड अशी रस्त्यांची वर्गवारी करून त्याप्रमाणे वाहन पार्किंग शुल्काचे दर निश्चित केले होते. या संबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधरण सभेनेही मान्यता दिली होती. परंतु करोना काळ आणि काही तांत्रिक अडचणींमुळे पार्किंग धोरणाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती.

गेल्या काही वर्षांपासून कागदावर असलेले पार्किंग धोरण प्रत्यक्षात उतरविण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने जोरदार हाचाली सुरू केल्या असून या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्याची वर्गवारी पुन्हा निश्चित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून नवीन रस्त्यांची निर्मिती झाली आहे. काही रस्त्यांवर कोंडी होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीचा पाहाणी करण्यासाठी पालिकेने पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पार्किंग धोरणाची लवकरच अंमलबजावणी होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.