प्रकाश लिमये

मीरा-भाईंदरमधील फलकांना स्थैर्य प्रमाणपत्र नाही

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

काही दिवसांपूर्वीच पुण्यात रस्त्यालगत असलेले महाकाय होर्डिग कोसळून चार जणांचा मृत्यू ओढवला होता. या घटनेची पुनरावृत्ती मीरा-भाईंदर शहरात कधीही होऊ शकेल अशी परिस्थिती आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बहुतांश होर्डिग्जना बंधनकारक असलेले स्थैर्य प्रमाणापत्र (स्टॅबिलिटी सर्टिफिकेट) महापालिकेकडे सादरच करण्यात आले नसल्याची खळबळजनक बाब माहितीच्या अधिकारात उघडकीस आली आहे. त्यामुळे ही होर्डिग्ज नागरिकांच्या जीविताला थेट धोकादायक ठरणारी आहेत.

पुण्यात कमकुवत झालेले होर्डिग कोसळून त्यात चार जणांचा बळी गेला होता. त्यानंतर होर्डिग्जसाठी आवश्यक असलेल्या स्थैर्य प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत आला. मीराभाईंदर शहरात मुख्य रस्त्यालगत तसेच महामार्गालगत सुमारे ३५० छोटी-मोठी होर्डिग्ज उभारण्यात आली आहेत.

यातील सुमारे १५० होर्डिग्जसाठी आवश्यक असलेले स्थैर्य प्रमाणपत्र महापालिकेकडे सादरच करण्यात आले नसल्याचे आणि ज्या होर्डिग्जची स्थैर्य प्रमाणपत्रे सादर करण्यात आली आहेत त्या होर्डिग्जची कित्येक वर्षांत फेरतपासणीच करण्यात आली नसल्याचे माहितीच्या अधिकारात नुकतेच उघडकीस आले आहे. त्यामुळे ही होर्डिग्ज म्हणजे साक्षात मृत्यूचे सापळेच बनले आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने रस्त्यालगत सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी होर्डिग्ज उभारण्यास परवानगी दिलेली आहे.

विविध जाहिरात कंपन्यांनी यावर होर्डिग्ज उभारली आहेत. जाहिरात कंपन्यांसोबत महापालिकेने केलेल्या करारानुसार प्रत्येक होर्डिग्जसाठीचे स्थैर्य प्रमाणपत्र सादर करणे जाहिरात कंपन्यांना बंधनकारक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत आवश्यक आहे. परंतु ३५० होर्डिग्जपैकी सुमारे १५० होर्डिग्जसाठी स्थैर्य प्रमाणपत्र घेण्यातच आलेली नाहीत. महापालिकेच्या जाहिरात विभागानेदेखील याकडे चक्क कानाडोळा केला आहे. त्यामुळे यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.उर्वरित २०० होर्डिग्जसाठीची स्थैर्य प्रमाणपत्र महापालिकेच्या दफ्तरी सादर होऊन पाच ते सात वर्षे उलटली आहेत.

वस्तुत: प्रत्येक होर्डिगचे सुरक्षेच्या दृष्टीने ठरावीक कालावधीनंतर संरचनात्मक लेखा परीक्षण करून त्याचे स्थैय प्रमाणपत्र वेळोवेळी महापालिकेकडे सादर करणे आवश्यक आहे. परंतु जाहिरात कंपन्यांनी फक्त एकदाच स्थैर्य प्रमाणपत्र सादर कूरन हात वर केले आहेत.

कंपन्यांना नोटिसा

शहरातील मुख्य रस्त्यावर, दुभाजकांमध्ये तसेच महामार्गालगत नाक्या नाक्यावर विविध आकाराची महाकाय होर्डिग्ज आज उभी आहेत. ही होर्डिग्ज सुरक्षेच्या दृष्टीने मजबूत आहेत की नाही याची खात्री खुद्द महापालिकेच्या जाहिरात विभागालाच नाही अशी परिस्थिती आहे. प्रशासनाचा निष्काळजीपणा म्हणजे थेट नागरिकांच्या जिवाशी खेळच असल्याचे पुण्यातील घटनेवरून स्पष्ट होत आहे.शहरात उभारण्यात आलेल्या होर्डिग्जची स्थैर्य प्रमाणपत्रे १५ दिवसांच्या आत सादर करा अशा नोटिसा जाहिरात कंपन्यांना बजावण्यात आल्या आहेत. यातील काही कंपन्यांनी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती महापालिकेच्या जाहिरात विभागाकडून देण्यात आली.

Story img Loader