लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाणे : वागळे इस्टेट भागातील रस्ता क्रमांक २२ येथील पासपोर्ट कार्यालयाजवळ असलेला नाल्यावर स्लॅब टाकून त्यावर रस्ता बनविण्याचे काम महापालिकेकडून सुरु आहे. हा रस्ता कचरा हस्तांतरित केंद्राकडे जाण्यासाठी तयार केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. एकीकडे हे कचरा हस्तांतरित केंद्र हटविण्यासाठी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असतानाही नाल्यावर रस्त्याचे बांधकाम कसे केले जात आहे असा सवालही नागरिकांकडून विचारला जात आहे.

वागळे इस्टेट भागातील सीपी तलाव परिसरात पालिकेचे कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या केंद्रावर शहराच्या विविध भागातून कचऱ्याचे संकलन करुन त्याचे वर्गीकरण केले जाते. याठिकाणी कचऱ्याचा मोठा ढीग तयार झाला आहे. दिवसभर याठिकाणी घंटा गाड्यांची वाहतुक सुरु असते. आधीच हा रस्ता अरुंद असताना,घंटा गाड्यांमुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. एकीकडे कचऱ्यामुळे परिसरात पसरलेली दुर्गंधी आणि त्यात होत असलेली वाहतूक कोंडी यामुळे स्थानिक नागरिक गेले अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. या कचरा हस्तांतरण केंद्रा विरोधात नागरिकांकडून गेले तीन वर्षांपासून मोर्चे आंदोलने, उपोषण करत हे केंद्र बंद करावे अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात, उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. तरी देखील कचरा हस्तातरण केंद्राकडे जाणारा रस्ता कसा तयार केला जात आहे, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

वागळे इस्टेट रोड नंबर २२ येथे पासपोर्ट कार्यालया जवळ मोठा नाला आहे. पावसाळ्यात डोंगरातून या नाल्यात पाण्याचा मोठ्याप्रमाणात प्रवाह येत असतो. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात अनेकदा या रस्त्यावर पाणी साचत असते. या नाल्यावर स्लॅब टाकून रस्ता तयार केला तर, यंदाच्या पावसाळ्यात नागरिकांना जास्त त्रास होण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्ते रामेश्वर बचाटे यांनी व्यक्त केली आहे. तसेच कचरा हस्तांतरण केंद्राबाबत न्यायालयात याचिका सुरु असून याचिकचा निर्णय जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत हे बांधकाम थांबवावे अशी मागणी देखील त्यांनी पत्राद्वारे महापालिकेला केली आहे.

या रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी टाळण्यासाठी याठिकाणी नाल्यावर पर्यायी रस्ता तयार केला जात आहे. तसेच नागरिकांना पावसाळ्यात या रस्त्यामुळे कोणताही त्रास होणार नाही. -विलास धुमाळ, कार्यकारी अभियंता, वागळे प्रभाग समिती, ठाणे महापालिका.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road construction by laying slabs on drain in wagle estate mrj