डोंबिवली – कल्याण, डोंबिवली शहरांमधील जुने तलाव, विहिरी विकास कामे, नवीन गृहप्रकल्पांसाठी बुजविण्याचा सपाटा बांधकामधारकांकडून सुरू आहे. आता डोंबिवली पश्चिमेतील कोपर भागात अनेक वर्षांचा नैसर्गिक झरे असलेला एका जुना तलाव बुजविण्याच्या जोरदार हालचाली रस्ते बांधकाम ठेकेदाराकडून सुरू आहेत. कोणत्याही परिस्थितीत नैसर्गिक झरे असलेला कोपर येथील जुना तलाव बुजवू नये म्हणून पर्यावरणप्रेमींनी शासनस्तरावर जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीतील शहराच्या मुख्य रस्ते, भागातील सावली देणारी झाडे रस्ता रूंदीकरण, काही गृहप्रकल्प उभारणाऱ्या विकासकांनी पालिकेच्या परवानग्या घेऊन तोडली. या झाडांच्या बदल्यात पालिकेने निश्चित केलेल्या आंबिवली परिसरातील जागेवर या विकासकांनी एका झाडाच्या बदल्यात १० झाडे लावून दिली आहेत.

४० वर्षापूर्वीच्या अनेक इमारती, घरांच्या परिसरात जुन्या विहिरी होत्या. या विहिरी विकासाच्या नावाखाली विकासकांनी बुजून टाकल्याचे चित्र कल्याण, डोंंबिवलीत आहे. नैसर्गिक स्त्रोत बुजवून पर्यावरणाची हानी करण्याचे काम एक यंत्रणा करत असल्याची टीका पर्यावरणप्रेमी करत आहेत.

हेही वाचा >>> मतदानापासून वंचित कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांची लवकरच उच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्याची दक्ष नागरिकांची तयारी

कोपर तलाव

कोपर पश्चिमेत खाडी किनारा भागात एक जुना तलाव आहे. याठिकाणी नागरिक गणपती विसर्जनासाठी, मासेमारीसाठी येतात. या तलावात नैसर्गिक झऱ्यांंमुळे बारमही पाणी असते.जैवविविधतेला हा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी मोठा आधार आहे. या तलावाच्या चारही बाजुने खारफुटी, जंगली झाडे आहेत. या तलावाच्या बाजुने माणकोली पुलाकडून येणारा रेतीबंदर रेल्वे फाटकाकडे जाणारा एक रस्ता बांधला जात आहे. एमएमआरडीएने माणकोली पुलाच्या डोंबिवली बाजूकडील उतार रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेचा वळण रस्ता बाधित केला. त्यामुळे डोंंबिवलीत येणाऱ्या वाहनांसाठी एमएमआरडीएला मोठागाव स्मशानभूमी, मल उदंचन केंद्र ते कोपर भागातून एक रस्ता रेतीबंदर रेल्वे फाटकाच्या दिशेने बांधावा लागत आहे. या रस्त्यासाठी कोपर भागातील नैसर्गिक तलाव बाधित होत आहे. त्यामुळे तो बाजुच्या भागात पाण्यासह स्थलांतरित करण्याचे प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहेत. नवीन जागेत चारही बाजुने सिमेंट भिंत बांधून हा तलाव संरक्षित केला जाण्याचा देखावा ठेकेदाराकडून उभारला जात आहे, असे पर्यावरणप्रेमींना सांगितले.

हेही वाचा >>> ठाण्यात ठेकेदाराची मुजोरी, मतदान यंत्र ठेवलेल्या परिसरात आदेशानंतरही खोदकाम करून विद्युत वाहिनी तोडली

या जुन्या तलावाखाली नैसर्गिक झरे आहेत. ते कसे स्थलांतरित करणार. एकदा जुन्या तलावाच्या जागी रस्ता बांधून झाला की ते झरे काँक्रीटखाली बुजले जाणार आहेत, अशी माहिती पर्यावरणप्रेमींंनी दिली.

डोंबिवली खाडी भागातील खारफुटी जंगल भूमाफियांनी बेकायदा चाळींसाठी नष्ट करून या भागातील जैवविविधत नष्ट केली आहे.

देवीचापाडा चौकशी

देवीचापाडा जेट्टी जवळ तीन महिन्यापूर्वी मातीचे भराव टाकून माफियांनी खारफुटी नष्ट केली. या प्रकरणाची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. याची चौकशी करण्यासाठी एक पथक डोंबिवलीत येत आहे. कल्याण, डोंबिवली शहरातील जैवविविधता, जुने पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत विकासकामे, गृहप्रकल्पांच्या नावाखाली बुजविले जात आहेत. यामध्ये पर्यावरणाची हानी होत आहे. अशा परिस्थितीत कोपरमधील जुना नैसर्गिक झरे असलेला तलाव स्थलांतरित किंवा बुजविण्यात येऊ नये यासाठी आम्ही शासनस्तरावर प्रयत्नशील आहोत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road contractors effort to fill natural pond at kopar in dombivli zws