कल्याण – कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी, खडेगोळवली, मलंगगड रस्ता, तिसगाव नाका, चक्की नाका भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर फेरीवाले हातगाड्या, ठेले लावून व्यवसाय करतात. हातगाड्या, ठेल्यांमुळे रस्ते अडून राहत असल्याने कल्याण पूर्व भगातील अनेक रस्त्यांवर दररोज संध्याकाळपासून वाहतूक कोंडी होत असल्याने प्रवासी त्रस्त आहेत.

बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवली-ढोकळीमधील एक वाहन जाण्याएवढ्या अरूंद रस्त्यांवर हातगाड्या लावण्यात येतात. या रस्त्यांवर मोठे वाहन आले की हे रस्ते कोंडीत अडकतात, अशा तक्रारी स्थानिक रहिवासी करत आहेत. मागील दीड महिन्यापासून कल्याण डोंबिवली पालिकेचे प्रभाग स्तरावरील साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथक, अतिक्रमण नियंत्रण पथकाचे कर्मचारी विधानसभा निवडणूक कामात व्यस्त होते. त्यामुळे फेरीवाल्यांवर कारवाई होत नसल्याने मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर विक्री व्यवसाय करण्यास फेरीवाल्यांना मोकळीक मिळाली होती. ठराविक स्थानिक मंडळींच्या आशीर्वादाने हे फेरीवाले रस्त्यावर बसत असल्याच्या तक्रारी स्थानिक व्यापाऱ्यांनी, रहिवाशांनी केल्या.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात मतमोजणीच्या दिवशी वाहतूक बद्ल

खडेगोळवली भागातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर दररोज संध्याकाळी चार वाजल्यानंतर भाजीपाला, इतर वस्तू विक्रीचा बाजार भरतो. या बाजारामुळे या भागात वाहन कोंडी होत असल्याच्या तक्रारी आहेत. कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील चेतना विद्यालय ते नेवाळी नाक्यापर्यंत अनेक ठिकाणी रस्त्यांवर टपऱ्या, हातगाड्या, रस्त्याच्या कडेला ठेले लावून फेरीवाले व्यवसाय करतात. मलंगगड रस्त्यावरून बदलापूर, तळोजा, शिळफाटाकडे जाणारी येणारी वाहने धावत असतात. याशिवाय मलंगगड जाणारे भाविक याच रस्त्यावरून येजा करतात. त्यांना मलंगगड रस्त्यावरील कोंडीचा नेहमीच फटका बसतो.

कल्याण पूर्व भागातील नागरी वस्ती वाढली आहे. त्यामुळे पूर्व भागातील रेल्वे स्थानकाजवळून खासगी वाहने, रिक्षा, दुचाकीने घरी जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. या भागातील बहुतांशी नोकरदार वर्ग कल्याण पूर्व रेल्वे स्थानक भागात दुचाकी वाहनाने येतो. संध्याकाळी कामावरून परतल्यावर आपल्या वाहनाने घरी परततो. या वाहनांमध्ये रिक्षेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यांनाही रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या फेरीवाल्यांचा त्रास होतो.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात मतटक्का वाढला, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ४ टक्क्यांनी मतदान वाढले

पालिका अधिकाऱ्यांनी आता निवडणुका संपल्याने फेरीवाल्यांना हटविण्याची जोरदार मोहीम हाती घेण्याची मागणी स्थानिक व्यापारी, प्रवासी, स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

कल्याण पूर्व भागातील फेरीवाल्यांंवर नियमित कारवाई केली जाते. निवडणूक कामामुळे कर्मचारी वर्ग व्यस्त होता. त्यामुळे कारवाईत थोडा व्यत्यय येत होता. आता निवडणुका संपल्यामुळे पूर्ण क्षमतेने रस्ते अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली जाईल. – भारत पवार, साहाय्यक आयुक्त, ई प्रभाग. कल्याण पूर्व.