पावसाळय़ातील खड्डेभरणीसाठी चार कोटी खर्च

ठाणे शहरातील मुख्य रस्ते तसेच उड्डाणपूल अखत्यारीत नसतानाही त्यावर पावसाळय़ात पडलेले खड्डे बुजवल्यामुळे ठाणे महापालिकेला तीन कोटी ९५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. राज्य सरकारच्या ताब्यात असलेल्या या रस्त्यांच्या डागडुजीच्या खर्चासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद नसल्याने पालिकेने ठाणे मेट्रो प्रकल्पासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून ही रक्कम खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव शनिवारी सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

ठाणे शहरातून जाणारे महामार्ग व उड्डाणपूल राज्य सरकारच्या विविध विभागांच्या ताब्यात आहेत. मात्र या मार्गावरील खड्डय़ांबद्दल राजकीय मंडळींनी महापालिकेवरच शरसंधान केले होते. त्यानंतर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या रस्त्यांचीही डागडुजी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कामे करण्यात आली. मात्र या कामांसाठीचा खर्च कोणी द्यायचा, असा प्रश्न निर्माण झाला होता.

शासनाच्या अन्य विभागांच्या ताब्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद नाही. त्यामुळे या दुरुस्तीच्या खर्चासाठी अर्थसंकल्पातील ठाणे अंतर्गत मेट्रो प्रकल्पासाठी राखीव ठेवलेल्या निधीत तीन कोटी ९५ लाख रुपयांची कपात करून तो निधी रस्ते दुरुस्तीसाठी वळविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. निधीच्या पूर्वनियोजनाबाबत आयुक्त जयस्वाल आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीतील निर्णयानुसार यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला असून तो सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. शासनाच्या विविध विभागांच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील खड्डेभरणीसाठी संबंधित विभागाकडून निधी खर्च करणे अपेक्षित असतानाही महापालिका त्यावर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार आहे. या प्रस्तावावर सर्वपक्षीय नगरसेवक काय निर्णय घेतात, याकडे लक्ष लागले आहे.