लोकसत्ता खास प्रतिनिधी
डोंबिवली: ठाकूर्ली पूर्व रेल्वे स्थानका जवळील सर्वाधिक वर्दळीच्या खड्डे पडलेल्या रस्त्यावर कल्याण डोंबिवली पालिकेकडून पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हा रस्ता पालिकेच्या मागणीवरून वाहतूक विभागाने २५ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत रस्ते कामासाठी बंद ठेवण्यास पालिकेला परवानगी दिली आहे.
ठाकुर्लीतील जुने हनुमान मंदिर, चोळेगाव, बँक ऑफ महाराष्ट्र समोरील रस्ता ते रामभाऊ चौधरी रस्ता सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. कल्याण-डोंबिवली शहरांमध्ये येण्या जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून बहुतांशी वाहन चालक या रस्त्याला प्राधान्य देतात. गावठाण भागात असलेला या रस्त्यावर पाऊस सुरू झाल्यापासून खड्डे पडले आहेत. पालिकेने तात्पुरत्या उपाययोजना करून हे खड्डे बुजविले. या रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. जड, अवजड वाहने या चिंचोळ्या रस्त्यावरून धावतात.
आणखी वाचा-डोंबिवलीत नांदिवलीमध्ये गादी कारखान्याला आग
या रस्त्यावर काँक्रीट काम करणे अवघड आहे. त्यामुळे या रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी पालिकेचे डोंबिवलीचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे यांनी वाहतूक विभागाला पंधरा दिवस हा रस्ता बंद करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी गेल्या महिन्यात केली होती. गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्रोत्सव असल्याने सणासुदीत रस्ता बंद ठेवणे योग्य होणार नसल्याने वाहतूक विभागाने नवरात्रोत्सव नंतर हा रस्ता बंद करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी पालिकेला दर्शविली होती.
वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी मंगळवारी दसरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून पालिकेला ठाकुर्लीतील जुने हनुमान मंदिर रस्ते भागात पेव्हर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्ते कामामुळे कल्याण, ९० फुटी रस्ता भागाकडे येणाऱ्या, जाणाऱ्या प्रवाशांना १५ दिवस वळण घेऊन इच्छित स्थळी जावे लागणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांना येथून प्रवेशास मुभा आहे.
आणखी वाचा-ठाण्यातील तीन चौकात उन्नत मार्गिकेचा प्रस्ताव
प्रवेश बंद
कल्याण दिशेने ९० फुटी रस्त्याने हनुमान मंदिराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना हनुमान मंदिर येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. ही वाहने फोशीबाई भोईर चौक किंवा बंदिश हॉटेल येथून घरडा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.
डोंबिवलीतील पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, ठाकुर्ली उड्डाण पूलकडून ठाकुर्लीतील जुने हनमान मंदिर दिशेने येणाऱ्या वाहनांना ठाकुर्ली पूर्वेतील बँक ऑफ महाराष्ट्र, रामभाऊ चौधरी चौक येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे.