दोन नव्या मार्गिकांवर शाळांच्या बस, खासगी वाहनांचा तळ
शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या पोखरण रस्त्याचे ठाणे महापालिकेने रुंदीकरण केले असले तरी नव्याने खुल्या झालेल्या या रस्त्याच्या दोन मार्गिकांवर परिसरातील शाळेच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी अतिक्रमण केल्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे. सकाळच्या वेळी कार्यालयात जाण्यासाठी रिक्षा, कारने कार्यालयाकडे जाणारे ठाणेकर आणि त्याचवेळी शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस या सर्व वाहनांचा एकच कोंडाळा पोखरण रस्त्यावर होत असल्याने वाहतूक कोंडीचा त्रास अधिकच वाढत असतो. नव्याने तयार करण्यात आलेल्या मार्गिकांचा वापर केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनांकडून केला जात असल्याने इतर वाहनांना केवळ पूर्वीच्या जुन्या रस्त्याचा वापर करता येत असून याविरुद्ध नागरिकांकडून महापालिका आणि वाहतूकपोलिसांकडे तक्रारींची संख्या वाढू लागली आहे.
अरुंद पोखरण रस्त्यावरील अतिक्रमणे हटली. तेथील व्यापारी स्थलांतरित झाले. अडथळा ठरणारी झाडे हटवून त्यांचे दुसरीकडे पुर्नरोपण करण्यात आले, तर उच्चविद्युत वाहिन्यांचे टॉवर बाजुला करण्यात आले. महापालिकेच्या या रस्ता रूंदीकरणाच्या मोहिमेमुळे वाहतुक कोंडीतून सुटका होईल अशी अपेक्षा होती. मात्र मार्गिकांवरील वाहनांच्या पार्किंगने ती फोल ठरली आहे. नव्याने खुल्या झालेल्या दोन मार्गिकांवर शाळेच्या बस उभ्या करण्यात येतात. त्यामुळे सकाळी-दुपारी शाळा भरण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेत या परिसरात वाहनांचा कोंडाळा जमा होतो.
पोखरण रस्त्याच्या रुंदीकरणानंतर रस्त्याची अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेमध्ये आहेत. त्यामध्ये महावितरणचा टॉवर रस्त्यातच पडला आहे. अनेक ठिकाणी कामे सुरू असून त्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले असून ती कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे दोन मार्गाचा वापर केवळ शाळेच्या बसेसपुरता मर्यादित राहिला आहे.
या भागात महापालिकेने अडथळे उभे केले असून त्यांचा उपयोग शालेय बसेसपुरता मर्यादित राहिला आहे. या दोन्ही मार्गिका वाहतुकीस सुरू करून या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्याची गरज आहे, अशी मागणी करण्यात येत आहे.
पोखरण रस्ता रुंद झाल्यानंतरही तेथील वाहतूक कोंडी सुटण्याऐवजी ती अधिकच वाढली आहे. रुंद रस्त्यावर शाळेची वाहने, शाळेत विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांची वाहने पार्क केलेली असतात. वाहतूक पोलिसांनी इथे वाहतूक नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात करायला हवेत.
– कॅसबर ऑगस्ट्रीन, ठाणे सिटिझन व्हॉईस संस्था
पोखरण रस्त्यावरील वाहतूक कोंडीमागची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या भागाची पाहणी करून त्यानुसार योग्य कारवाई करण्याचा आमचा प्रयत्न आहे. याविषयीची माहिती करूनच बोलणे योग्य ठरू शकेल.
– संदीप पालवे, उपायुक्त, ठाणे वाहतूक शाखा