सुरक्षित प्रवासाचा संदेश देत ठाण्यातील महिला, गृहिणी, मुलींनी एकत्र येऊन कोरम मॉल येथून बाइक रॅली काढली. मोटारसायकल स्वारी ही काल-परवापर्यंत पुरुषांची आणि त्यातही तरुणांची मक्तेदारी मानली जात होती. ही मक्तेदारी मोडीत काढत सुमारे ५० हून अधिक महिलांनी बाइक चालवत सुरक्षित प्रवासाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. ठाणे पोलिसांच्या वाहतूक सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेली ही प्रभात फेरी ठाणेकरांचे आकर्षण ठरली होती.
स्त्रिया आणि मोटारसायकल ही संकल्पना आता वेगळी राहिली नाही. तरीही बुलेटसारख्या अवजड मोटारसायकलींवर स्वारी करत ठाणेकर महिलांनी आपणही मागे नसल्याचे यावेळी दाखवून दिले. रस्ता सुरक्षा अभियानात भाग घेऊन चालकांनी वाहन चालवताना कोण-कोणत्या नियमांचे पालन करावे याचे सादरीकरण केले. ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांनी झेंडा दाखवून या प्रभातफेरीला सुरवात केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग ठाणे पी.व्ही. मठाधिकारी आणि कोरमचे सरव्यवस्थापक देवा ज्योतुला हे कार्यक्रमाला उपस्थित होते. हल्ली समाजात होणाऱ्या वेगवेगळ्या बदलांना मॉल्स जबाबदार असतात. त्यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताहात सहभागी होऊन जनजागृती करणे, अशा विविध कार्यात त्यांचा सहभाग असणे हे त्यांचे कर्तव्यच आहे, असे मत कोरमचे सरव्यवस्थापक देवा यांनी यावेळी मांडले. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार भारतात १० टक्के मृत्यू हे रस्ता अपघातात होतात.

Story img Loader