ठाणे : भिवंडी शहरात मेट्रो मार्गिकेच्या निर्मामाचे काम सुरू आहे. या कामासाठी भिवंडीत मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी ६ आणि बुधवारी रात्री १० ते गुरुवारी सकाळी ६ वाजता अंजुर चौक ते अंजुरफाटा पर्यंत सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या कामामुळे येथील वाहतुक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आली असून त्याचा परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेवर बसणार आहे. घोडबंदर मार्गावरून येथील बहुकतांश वाहतुक वळविण्यात आली आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रोची कामे सुरू आहेत. त्यात ही वाहतुक घोडबंदर मार्गे वळविल्याने कोंडीची शक्यता व्यक्त केली आहे.
ठाणे ते कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून भिवंडी शहरात सुरू आहे. या कामासाठी अंजुर चौक ते अंजुर फाटा याठिकाणी लोखंडी गर्डर टाकण्याचे काम आज, मंगळवारपासून सुरू होणार आहे.
भिवंडी शहरात मोठ्याप्रमाणात गोदामे आहेत. त्यामुळे उरण जेएनपीटी आणि गुजरात येथून सुटणारी हजारो अवजड वाहने भिवंडी शहरात येत असतात. तसेच हलक्या वाहनांची वाहतुक देखील मोठ्या प्रमाणात होत असते. या कामा दरम्यान अपघात किंवा कोंडी होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी वाहतुक बदल सुचविले आहेत. त्यानुसार, मंगळवारी रात्री १० ते बुधवारी सकाळी ६ आणि बुधवारी रात्री १० ते गुरुवारी सकाळी ६ या कालावधीत अंजुरचौक ते अंजुरफाटा या मार्गावरील वाहतुक पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय वाहतुक पोलिसांनी घेतला आहे. येथील वाहतुक पोलिसांनी पर्यायी मार्गावरून वळविण्याचा निर्णय घेतला असून यामुळे पर्यायी मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी मुंबई येथून मुंब्रा माणकोली मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गॅमन जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने खारेगाव टोलनाका, कापुरबावडी चौक घोडबंदर मार्गे वाहतुक करतील. मुंबई येथून माजिवडा वाय जंक्शन नारपोली मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना माजिवडा वाय जंक्शन येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कासारवडवली, घोडबंदर मार्गे वाहुक करतील. मुंबई, नवी मुंबई, बाळकुम नाका, अंजुरफाटा मार्गे गुजरात, भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना बाळकुमनाका येथे प्रवेशबंदी असेल. गुजराच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने घोडबंदर मार्गे तर भिवंडीच्या दिशेने वाहतुक करणारी वाहने माजिवडा, भिवंडी मार्गे वाहतुक करतील.
गुजरात येथून चिंचोटी नाका मार्गे अंजुरफाटा मार्गे नाशिक, मुंबई, नवी मुंबईच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना चिंचोटी नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने चिंचोटी नाका, घोडबंदर मार्गे, गायमुख मार्गे वाहतुक करतील. अंजुरफाटा मार्गे मुंबई , गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना कल्याण नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कल्याण नाका, अशोक नगर, भादवड नाका, रांजनोली नाका, कोनगाव मार्गे वाहतुक करतील. नाशिक येथून गुजरातच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना वडपे नाका येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने वडपे नाका, भिवंडी, वाडा मार्गे वाहतुक करतील.