डोंबिवली – डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील रस्त्यांवरून वाहनांची येजा असते. रेल्वे स्थानकातून बाहेर पडणारे प्रवासी या रस्त्यावर लोंढ्याने बाहेर आले की रेल्वे स्थानकाजवळील डाॅ. राॅथ रस्ता वाहन कोंडीच्या विळख्यात अडकतो. या रस्त्यावरील दुकानांमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे कोंडीत आणखी भर पडते.
डाॅ. राॅथ रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. या रस्त्यांवरून दुचाकी, मोटार, रिक्षा, टेम्पो रिक्षा यांची सतत वाहतूक असते. त्यात या रस्त्याच्या एका बाजुला बाजारपेठ आहे. ग्राहक खरेदीसाठी आल्यावर राॅथ रस्त्यावर वाहने उभी करून खरेदीसाठी जातात. त्यामुळे या १२ फुटांच्या अरुंद रस्त्यावर सकाळ, संध्याकाळ कोंडी होते. अनेक वाहन चालक आपल्या नातेवाईकांना घेण्यासाठी रेल्वे स्थानक भागात येऊन थांबतात. त्यांची वाहने रेल्वे प्रवेशव्दारावर येऊन थांबलेली असतात.
हेही वाचा – कल्याणमध्ये काळा तलाव भागात तरुणांकडून गोळीबार
राजाजी रस्ता भागातून येणारा वाहन चालक डाॅ. राॅथ रस्त्याने नेहरू रस्ता किंवा फडके रस्त्याकडे जाण्यासाठी वर्दळीच्या राॅथ रस्त्याचा वापर करतो. नेहरू रस्त्याकडून येणारा वाहन चालक राजाजी रस्ता, सुनीलनगर, आयरे भागात जाण्यासाठी रेल्वे स्थानक भागातील रस्त्याने येजा करता. रेल्वे स्थानक भाग दररोज कोंडीत अडकलेला असतो. रेल्वे स्थानकात जाणाऱ्या प्रवाशांना अडथळ्याची शर्यत पार करत रेल्वे स्थानकात जावे लागते.
हेही वाचा – गुन्हा दाखल करण्यास विलंब, अभियंत्यांना मारहाण प्रकरणाचे तीव्र पडसाद
गेल्या वर्षी वाहतूक विभागाने नेहरू रस्त्यावरील कैलास लस्सी आणि रामनगर रेल्वे तिकीट खिडकी येथे अडथळे उभे करून डाॅ. राॅथ रस्त्यावरून वाहने नेण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे हा रस्ता फक्त पादचाऱ्यांसाठी उपलब्ध होता. आता या रस्त्यांवरून सर्व प्रकारची वाहने धावत असल्याने पादचारी हैराण आहेत. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजय कुमावत, पथक प्रमुख राजेंद्र साळुंखे यांच्याकडून राॅथ रस्ता भागात एकही फेरीवाला बसणार नाही याची काळजी घेतली जाते. हा रस्ता, रामनगर तिकीट खिडकी परिसर फेरीवाला मुक्त झाला आहे. या मोकळ्या रस्त्यांवरून वाहनांची येजा सुरू असल्याने पादचारी आणि रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतो.