लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : ठाणे शहरातील हवा गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करत पालिका प्रशासनाने मंगळवार सायंकाळपासून शहरातील मुख्य सिमेंटचे रस्ते धुण्याचे काम सुरू केले आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रीया केली जात असून या प्रकल्पातील पाण्याद्वारे शहरातील रस्ते धुण्यात येत आहेत.
ठाणे येथील वर्तकनगर भागात प्रस्तावित असलेल्या ‘भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे’ भूमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच झाले. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी हवा प्रदुषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबईच्या धर्तीवर ठाणे शहरातील रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ ठेवायचे आणि रस्ते धुलाईसाठी प्रक्रिया केलेले पाणी वापरण्याचे निर्देश त्यांनी आयुक्तांना यावेळी दिले होते. या आदेशानंतर पालिका प्रशासनाने आता शहरात रस्ते धुलाईचे काम हाती घेतले आहे.
आणखी वाचा-कल्याणमधील वालधुनी भागात तरूणांची दहशत
नौपाडा-कोपरी, वागळे, सावरकर-लोकमान्यनगर, वर्तकनगर, उथळसर, माजिवाडा-मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा अशा महापालिकेच्या एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत. या भागातील मुख्य रस्त्यांची प्रक्रीया केलेल्या पाण्याने धुलाई करण्याचे नियोजन आखण्यात येत आहे. नियोजनाचे काम सुरू असले तरी पालिकेने मुख्य रस्त्यांची पाण्याने धुलाई सुरू केली आहे. कोपरी येथील मलनिस्सारण प्रकल्पातील पाण्यावर प्रक्रीया केली जात असून या प्रकल्पातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याने रस्ते धुण्यात येत आहेत. टँकरद्वारे रस्त्यांवर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. धुळ प्रदुषण रोखण्यासाठी ही उपाययोजना केली जात आहे. डांबरी रस्ते पाणी धुलाईने खराब होण्याची शक्यता असून यामुळे केवळ सिमेंट रस्तेच धुण्यात येत आहेत.
आणखी वाचा-भिवंडी महापालिकेच्या साहाय्यक आयुक्तांना धक्काबुक्की
ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ३८४ किमी लांबीचे रस्ते आहेत. त्यापैकी २०५ किमी लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीट, युटीडब्ल्युटीचे आहेत. याशिवाय, ठाणे महापालिका क्षेत्रात इतर संस्थांच्या मालकीचे ३६ किमी लांबीचे रस्ते आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार प्रदुषण कमी करण्यासाठी शहरातील सिमेंट रस्ते धुलाईचे काम सुरू करण्यात आले असून त्यासाठी मलनिस्सारण प्रकल्पातील प्रक्रीया केलेल्या पाण्याचा वापर करण्यात येत आहे. -प्रशांत सोनाग्रा, नगरअभियंता, ठाणे महापालिका