कल्याण – डोंबिवलीतील मानपाडा रस्त्याचा सागाव भागातील रूंदीकरणाअभावी रखडलेला रस्ता, कल्याणमधील आधारवाडी भागातील उंबर्डे येथील रखडलेला रस्ता रूंदीकरणाचे काम तातडीने मार्गी लावा. या रखडलेल्या मार्गातील अतिक्रमणे तत्काळ हटवा, असे आदेश कल्याण डोंबिवली पालिकेच्या आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पालिका हद्दीतील टिटवाळा ते डोंबिवली मोठागाव-२७ गाव रस्ता १८ वर्षापासून रखडला आहे. डोंबिवली, कल्याण शहराअंतर्गत अनेक महत्वाचे वर्दळीचे रस्ते स्थानिकांचा विरोध, राजकीय हस्तक्षेपामुळे रूंदीकरण करणे पालिकेला शक्य झाले नाही. यापूर्वीच्या कोणत्याच आयुक्तांनी शहर विकासात महत्वाची असलेली ही रस्ते कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला नाही. आठ वर्षापूर्वी पालिकेने नगररचना विभागात भूसंपादन विभाग तयार करून त्याची जबाबदारी अभियंता सुरेंद्र टेंगळे यांच्यावर सोपवली होती. १८ वर्ष नगररचना विभागात राहूनही अनुभवी अभियंता म्हणून टेंगळे यांनी रखडलेली रस्ते कामे, बाह्यवळण रस्ता मार्गी लावण्यात कधीही पुढाकार घेतला नाही, असे काही पालिका अधिकारीच सांगतात. बहुतेक रस्ते अरूंद, अनेक ठिकाणी रखडलेले रुंदीकरण असे चित्र आहे.

हेही वाचा – डोंबिवली जवळील पलावा भागात अंमली पदार्थ जप्त, दोन जण अटकेत

आयुक्तांची तंबी

डोंबिवलीतील सर्वाधिक वर्दळीच्या मानपाडा रस्त्यावरील शिवाजीनगर वजनकाटा ते सागाव हनुमान मंदिर रस्त्याचा भाग स्थानिकांच्या विरोधामुळे रूंंदीकरण करता आले नसल्याची बाब आयुक्त डाॅ. जाखड यांना रस्ते कामांचा आढावा घेताना निदर्शनास आली. या रस्ते कामात सुमारे ४५० हून अधिक बाधित, काही इमारती, व्यापारी गाळे बाधित होणार आहेत. या रस्त्यावरील अतिक्रमणे का हटवली नाहीत, असा प्रश्न उपस्थित करत आयुक्त डाॅ. जाखड यांनी अतिक्रमणे हटविण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. ई प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी मानपाडा रस्ते मार्गातील अतिक्रमणे हटविणे, संबंधितांना नोटिसा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

कल्याण आधारवाडी भागातील उंबर्डे येथील एका रस्त्याचा ४० मीटरचा भाग भूसंपादना अभावी रखडला आहे. या रस्त्याचे नियंत्रक अभियंता सुरेंद्र टेंगळे यांना हे काम का रखडले याविषयी आयुक्त जाखड यांनी विचारणा केली. बाधित नागरिक जमिनीचा मोबदला जास्त दराने मागत असल्याचे टेंगळे यांनी आयुक्तांना सांगितले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून तातडीने या रस्त्यासाठी भूसंपादन, बाधितांना मोबदला देण्याची प्रक्रिया पूर्ण करून रस्ते काम सुरू करा, अशी तंंबी आयुक्तांनी देताच ४८ तासांच्या आत या रखडलेल्या रस्त्याच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा – भाईंदर : नव्या वर्सोवा पुलाची दुरुस्ती, पावसाळ्यात खड्डे पडल्याने आता नव्याने काम सुरू

“मानपाडा रस्त्याच्या रूंदीकरणात अडथळा ठरणारी अतिक्रमणे हटिवण्यास सुरूवात केली आहे. पक्क्या बांधकामांवरही टप्प्याने कारवाई केली जाणार आहे.” – भारत पवार, साहाय्य्क आयुक्त, ई प्रभाग, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road widening works at manpada umbarde should be started immediately order of kalyan dombivli mnc commissioner indurani jakhad ssb
Show comments