लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण : कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील मागील अनेक वर्ष रखडलेले सर्व रस्ते मार्गी लावण्याचे आदेश आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिले आहेत. यामुळे मागील काही वर्षापासून कल्याण पश्चिमेतील सापाड ते गणपती मंदिर दरम्यानचा रखडलेला रस्ता मार्गी लावण्याचे नियोजन पालिकेने केले आहे. ब प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी या रस्ते मार्गातील सर्व अतिक्रमणे काढून टाकली.

सापाड ते गणपती मंदिर दरम्यान चाळी, इमारतींचे कोपरे, व्यापारी गाळे अशी १० हून अधिक बांधकामे होती. पालिकेने अनेक वेळा ही बांधकामे तोडण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिकांचा विरोध असल्याने पालिकेला ही कारवाई करता आली नव्हती. काही वेळा या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होत असल्याने ही बांधकामे तोडली जात नव्हती.

आणखी वाचा-येऊरचे बेकायदा बांधकाम पुन्हा कचाट्यात, परवानगी तपासण्याचे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे आदेश

आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्या पासून डॉ. इंदुराणी जाखड यांनी पालिका हद्दीतील सर्व जुन्या रस्त्यांचा आढावा घेऊन ते मार्गी लावण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. ही कामे मार्गी लावताना काही अडथळे आले तर ते घटनास्थळीच मार्गीच लावा, असे आदेश जाखड यांनी दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक वर्षापासून रखडलेल्या विषयावर सुस्त असलेली प्रशासकीय यंत्रणा आता झटून कामाला लागली आहे.

सापाड ते गणपती मंदिर दरम्यानची अतिक्रमणे ब प्रभागाचे साहाय्य्क आयुक्त राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांच्या उपस्थितीत तोडण्यात आली. अतिक्रमणे तोडल्यानंतर तातडीने या रस्ते कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य ठेकेदाराने आणून टाकण्यास सुरूवात केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Road widening works in sapad village were removed in kalyan mrj
Show comments